मोठी बातमी! इतिहासात पहिल्यांदाच उजनी गाठणार तळ; बॅकवॉटरवरील उपसा बंदच्या हालचाली; बंधारा परिसरात २ तासच वीजपुरवठा; जिल्ह्यात मार्चमध्येच २१ टॅंकर

उजनी धरण उणे 36 टक्क्यांवर असून बाष्पीभवन, उजनी जलाशयातून शेतीसाठी उपसा व पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी 8 दिवसाला अंदाजे 1 टीएमसी पाणी संपत आहे. आपल्याकडे शक्यतो जुलैमध्ये पाऊस पडतो. त्यामुळे यंदा धरण पहिल्यांदाच उणे 70 टक्क्यांपर्यंत जाईल अशी स्थिती आहे.
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात घेण्यात आलेल्या चारीत मोठ्या संख्येने असलेले  कृषीपंपांचे पाइप.
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात घेण्यात आलेल्या चारीत मोठ्या संख्येने असलेले कृषीपंपांचे पाइप.sakal

सोलापूर : उजनी धरण उणे ३६ टक्क्यांवर असून बाष्पीभवन, उजनी जलाशयातून शेतीसाठी उपसा व पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी आठ दिवसाला अंदाजे एक टीएमसी पाणी संपत आहे. आपल्याकडे जूनअखेर किंवा जुलैमध्ये पाऊस पडतो. त्यामुळे यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे ७० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी सद्य:स्थिती आहे. २०१५-१६ मध्ये धरण उणे ६० टक्के झाले होते. आता धरणाच्या बॅक वॉटरवरील पाणी उपशावर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमध्ये देखील चिंताजनक स्थिती आहे. सध्या जिल्ह्यातील एकरूख, हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, बोरी व पिंपळगाव ढाळे या सात मध्यम प्रकल्पांमध्ये देखील सद्य:स्थितीत दीड टीएमसीपेक्षाही कमी पाणी आहे. उजनी धरण देखील तळ गाठत असून १५ मे दरम्यान सोलापूर शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून सहा ते साडेसहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. बॅक वॉटरवरून आठ दिवसात एकदा एक टीएमसी पाणी संपत असल्याची सद्य:स्थिती आहे.

धरण परिसरातील शेतीसह इंदापूर, बारामती, धाराशिव, कर्जत-जामखेड या शहरांसह कुर्डुवाडीची पाणीपुरवठा योजना बॅक वॉटरला आहे. सोलापूरचे एक आवर्तन आणि बॅक वॉटरवरील उपसा, उन्हाळ्यातील बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर मेअखेर धरणातील अंदाजे १५ टीएमसी पाणी संपेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे पाऊस लांबल्यास जुलैमधील आषाढी वारीसाठी देखील अडीच टीएमसीपर्यंत पाणी सोडावे लागेल आणि त्याचवेळी सोलापूर शहरासाठी आणखी एक अतिरिक्त आवर्तन सोडावे लागेल. त्यावेळी धरणातील मृतसाठा उणे ७० टक्क्यांपेक्षाही खोलवर जाऊ शकतो, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

नदीतील बंधारा परिसरात आता दोनच तास वीज

हिळ्ळी, चिंचपूर, औज, गुरसाळे, भोसे, पंढरपूर, उचेठाण या बंधाऱ्याजवळील वीजपुरवठ्यावर निर्बंध घातले जाणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र महावितरण अधिकाऱ्यांना पाठविल्याचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांना आता दररोज केवळ दोन तासच वीज मिळणार आहे. पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

२६ गावे अन्‌ २०४ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणी

टॅंकरमुक्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर ग्रामीणमध्ये सध्या २८ टॅंकर सुरू आहेत. २६ गावे आणि २०४ वाड्या-वस्त्यांवरील लोकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मागील सहा-सात वर्षांत पहिल्यांदाच मार्चमध्ये एवढे टॅंकर सुरू झाले आहेत. अजूनही दिवसेंदिवस टॅंकरची मागणी वाढत आहे, पण निकषांच्या साखळदंडात त्यासाठी विलंब होत असल्याची वस्तुस्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com