उच्च महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आता बायोमेट्रिक हजेरीचे बंधन! परीक्षा केंद्रांवर असणार सीसीटीव्ही कॅमेरे, परीक्षांवर आता विद्यापीठातूनच लक्ष

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि शिस्तीला प्राधान्य देत आता विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असणार आहे.
Pune News

Biometric Attendance Rule

esakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि शिस्तीला प्राधान्य देत आता विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असणार आहे. प्रवेश समितीच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना तशा सूचना दिल्या आहेत.

बुधवारी (ता. १०) विद्यापीठात कुलगुरू डॉ. महानवर यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश समितीची बैठक पार पडली. यावेळी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ऑनलाइन पोर्टलद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी ‘एईडीपी’अंतर्गत महाविद्यालयांनी आपल्या परिसरातील उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन योग्य विषयांची निवड करावी तसेच ते अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवावेत, असेही कुलगुरू म्हणाले.

परीक्षेतील हालचालींवर विद्यापीठातून लक्ष

विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांमधील परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे. त्या सीसीटीव्हीचे आयपी ॲड्रेस संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे पाठवावेत. यापुढे सर्व परीक्षा केंद्रांवरील परिस्थितीचे थेट निरीक्षण विद्यापीठातून होणार आहे. त्यातून कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

१ जुलैपासून नियमित अध्यापन

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी १ जुलै २०२६ पासून सर्व महाविद्यालयांमध्ये नियमित अध्यापन सुरू होईल. ‘एईडीपी’अंतर्गत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू करावेत आणि त्याचे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठवावेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून ते अधिक कौशल्यसंपन्न व रोजगारक्षम बनतील, असा विश्वास प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीकडे प्राचार्यांनी लक्ष ठेवावे

शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती अचूक व पारदर्शक पद्धतीने नोंदविण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी तातडीने बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित करून त्याचा नियमित वापर सुरू करावा. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संपूर्ण नोंद आणि रेकॉर्ड महाविद्यालयांनी जतन करून ठेवावी. विद्यार्थी महाविद्यालयात नियमित उपस्थित राहतील, याकडे प्राचार्यांनी विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Exam Pattern Changes
TET Promotion Rules Maharashtra
tet exam
NEET UG 2026
Marathi News Esakal
www.esakal.com