
Biparjoy Hurricane : 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानावर परिणाम होणार नाही
पुणे - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'बिपरजॉय' या चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानावर परिणाम होणार नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. तर गुरुवारी (ता. ८) मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात मात्र तापमान वाढलेले असेल.
राज्यात बुधवारी (ता. ७) उच्चांकी तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४३.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. विदर्भात पारा ४१ ते ४३ अंशाच्या दरम्यान आहे. तर मध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे.
सध्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून उत्तर छत्तीसगड ते तेलंगणा, उत्तर कर्नाटक असा हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे. त्यामुळे राज्यात ही पावसासाठी अनुकूल वातावरण होत असून पुढील चार दिवस कोकण येथील काही भागात विजांचा कडकडाटात पाऊस, तर किनारपट्टीवर सोसाट्याच्या वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
पुण्यात ढगाळ हवामान -
शहर आणि परिसरातील कमाल तपमनात चाड उतार सुरू असून अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यात पुण्यातील विविध भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून, उन्हाचा ताप जाणवत आहे. बुधवारी (ता. ७) शहरात ३७.४ अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.
सरासरीपेक्षा तापमानात ३ आणि ५ अंशांनी वाढ झाली होती. दरम्यान गुरुवारी (ता. ८) पुणे व परिसरात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.