
सोलापूर : सोलापूर शहर पोलिसांचे निर्बंध असतानाही सात जणांनी एकत्रित येऊन वाढदिवस साजरा केला. तलवारीने केक कापून साठे-पाटील वस्ती परिसरात दहशत निर्माण केल्याबद्दल सात जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर शहरात शांतता अबाधित राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार शस्त्रबंदी असून सार्वजनिक ठिकाणी मिरवणुका काढण्यास, सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे. परवानगीशिवाय पाच किंवा त्याहून अधिक व्यक्ती एकत्रित येण्यावरही निर्बंध आहेत. तरीदेखील, विजय साठे याच्या वाढदिवसानिमित्त सात जण एकत्रित आले आणि त्यांनी रस्त्यावर तलवारीने केक कापला.
लोकांच्या मनात दहशत निर्माण व्हावी, या उद्देशाने हवेत तलवार फिरवून केक कापला. त्यानंतर त्यांनी परिसरात बाईक रॅली देखील काढली. सर्वांनी पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात विजय साठे, प्रदिप सिद्राम संगटेकर, प्रशांत शिंगे, करण शिंगे, भैय्या पोळ व अन्य दोघांचा त्यात समावेश आहे. पोलिसांनी त्या सर्वांना नोटीस बजावली असून पोलिस उपनिरीक्षक सूरज कुतवळ तपास करीत आहेत.
शहरात २६ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध
आगामी काळात दिवाळी, श्री लक्ष्मी पूजन, दीपावली पाडवा, भाऊबीज असे सण साजरे होणार आहेत. याशिवाय आरक्षणासह अन्य प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९६१ मधील कलम ३७(१) नुसार आदेश काढले आहेत. त्यानुसार विवाह व अंत्ययात्रा वगळता मिरवणुका, मोर्चा, रॅली, आंदोलने, धरणे, सभांसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक असणार आहे. पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यावरही २६ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.