esakal | भाजपाने केली या चार उमेदवारांच्या नावांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

pat.jpg

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीत जागा वाटपाचा काथ्याकूट सुरू असताना भाजपाने चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

भाजपाने केली या चार उमेदवारांच्या नावांची घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाई (सातारा) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीत जागा वाटपाचा काथ्याकूट सुरू असताना भाजपाने चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. “युती होवो अथवा न होवो, वाईतून मदन भोसले, कोरेगावातून महेश शिंदे, दक्षिण कराड मतदारसंघातून अतुल भोसले आणि कराड उत्तरेतून मनोज घोरपडे हे भाजपाचे उमेदवार असतील”, अशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

वाई येथे शनिवारी झालेल्या सभेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिवसेनेची युती होणारच आहे. भाजपा आणि शिवसेनेतील काही जागांची अदलाबदलीचा विषय आहे. तो समन्वयातून सोडवू”, असे पाटील यांनी सांगितले होते. मात्र विजय बुथ संमेलनाच्या निमित्ताने रविवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भाजपा उमेदवारांच्या नावाची घोषणा करून खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना पाटील यांनी उमेदवारांना दिल्या.

सातारा काबीज करण्याचा भाजपचा डाव -    
शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे आणि फलटणलाही भाजपा उमेदवारी देणार हे निश्चित आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी पूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर जयकुमार गोरे यांनी रविवारी सोलापूर येथे भाजपामध्ये प्रवेश केला. फलटण मतदारसंघातून नव्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मर्जीतील अथवा विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर ही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याने येथेही भाजपाचा उमेदवार असेल हे जवळपास निश्चित आहे.  जिल्ह्यातील आठ पैकी सात जागांवर भाजपाकडून तयारी सुरू आहे. त्यामुळे भाजपाचा बहुतेक सातारा काबीज करण्याचा डाव दिसताे आहे.    

‘आपकी बार २८८ पार’ असे सांगत पाटील म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादीकडे निवडणुकीत उभे राहायला लोक दिसणार नाहीत. येत्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागणार असून, महाराष्ट्रात मजबूत भाजपा सरकार आणण्यासाठी येत्या वीस दिवसात विक्रमी काम करणार आहे. पुढील काही दिवसांत भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र दिसेल. भाजपाचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढत असून, भाजपाचा एकही उमेदवार निवडणुकीत पराभूत होणार नाही अशी रचना भाजपने केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top