Corona : अजित दादा तुमच्या सहकारी मंत्र्यांना सांभाळा, शेलारांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish Shelar On Corona

अजित दादा सहकारी मंत्र्यांना मर्यादा घाला, शेलारांचा सल्ला

मुंबई : कोरोना (Corona), ओमिक्रॉन (Omicron) आणि डेल्टा (Delta) याबाबत सरकारने सजग राहायला पाहिजे. राज्य सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. सर्वसामान्यांना नियम लावलतात. पण, सरकारच्या कार्यक्रमात नियम पाळले जातात का? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी उपस्थित केला. तसेच अजित दादा तुम्ही तुमच्या सहकारी मंत्र्यांना मर्यादा घाला, असा सल्ला देखील शेलारांनी दिला आहे.

हेही वाचा: लग्नसोहळे महागात? खासदार सुजय विखे पाटलांना कोरोनाची लागण

''मंत्र्यांना नियमात राहायला सांगा'' -

गेल्या अनेक दिवसापासून मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. लग्नसोहळ्यात उपस्थित लावलेल्या अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावरूनच शेलार यांनी अजित पवारांना सल्ला दिला आहे. अशीच संख्या वाढत असेल तर लॉकडाऊन करावा लागेल, असे संकेत अजित पवारांनी दिले होते. त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, ''माननीय दादा, आपल्या सहकारी मंत्र्यांना कुठंतरी मर्यादा घाला. त्यांना नियमात राहायला सांगा. सत्ताधारी पक्षातील युवासेनेच्या कार्यक्रमांवर बंदी घाला.''

''मुंबई पोलिस पालकमंत्र्यांसमोर झुकले का?'' -

भाजपचे कोरोना विरोधातील नियमाला समर्थन आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते नियम पाळायला तयार नाहीत. युवासेनेने वांद्रेत लेजर शो कार्यक्रम केला. त्यात प्रचंड गर्दी होती. त्यांना परवानगी दिली कशी? ३१ डिसेंबरला रात्री परवानगी मिळाली कशी? मुंबई पोलिस पालकमंत्र्यांसमोर झुकले का? काही मंत्री सभा घेतात. काही मंत्री लग्नसोहळ्यात जातात. हे सरकार जे निर्णय घेतात आणि घोषणा करतात ते मुंबईरांना पटणारे नाही. मंत्री महोदय, जे नियम जनतेला पाळायला सांगता ते सर्वात आधी तुम्ही पाळा. अधिवेशन असलं की जास्त दिवस नको कोरोनाची भीती आहे, हे सांगता. अधिवेशन संपलं की हेच मंत्री हजारो-लाखोंच्या गर्दीत कार्यक्रम करतात. आपण सर्व नियम पाळूया, अशी विनंती आहे असंही शेलार म्हणाले.

कोरोनाच्या काळात सोसायट्यांना मदत करण्याऐवजी वसुली सुरू आहे. ठाकरे सरकारचे वसुली करण्याचे हे कार्य आहे. शिवसेनेचे मुंबईकरावरील प्रेम बेगडी आहे. बिल्डरला जास्तीचा खर्च पडू नये म्हणून प्रीमियममध्ये दिलेली सूट 11 हजार कोटी आहे. पण सामान्य माणसाला सूट 462 कोटी आहे. विदेशी दारू विकणाऱ्यांना ५० टक्के सवलत दिली आहे. मुंबईकरांना अर्धा टक्का सवलत दिलेली नाही. शिवसेनेचं मुंबईकरांवरचं प्रेम बेगडी आहे. जितकी सवलत व्यावसायिक मित्रांना दिली, तितकी सवलत मुंबईकरांना का नाही? असा सवालही शेलारांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ashish ShelarAjit Pawar
loading image
go to top