कॉंग्रेसच्या बालेकिल्यात भाजपचे केंद्रीय मंत्री ठोकणार दोन दिवस तळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress

कॉंग्रेसच्या बालेकिल्यात भाजपचे केंद्रीय मंत्री ठोकणार दोन दिवस तळ

कऱ्हाड: आगामी सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रणनिती आखुन मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश हे कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात सोमवारी व मंगळवारी दोन दिवस तळ ठोकणार आहेत. त्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने देशातील 144 मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश हे उद्या रविवारपासुन सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर व जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सातारा लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

भाजपा कऱ्हाड दक्षिणच्यावतीने सोमवारी सायंकाळी पाच वाजता आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये भव्य महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजता त्याच्या उपस्थितीत ढेबेवाडी फाटा ते जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विरंगुळा बंगल्यापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी दहा वाजता वेणुताई चव्हाण सभागृहात नवमतदार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली.

टॅग्स :BjpSataraCongress