esakal | निसर्गाला तिघांचं सरकार मान्य नाही, आजच्या बंदचा निषेध - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

'निसर्गाला तिघांचं सरकार मान्य नाही, आजच्या बंदचा निषेध'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) ठेवायची गरज नाही. हे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात दोन मोठी वादळं आली. पण, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. हे तिघांचं सरकार निसर्गाला मान्य नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Maharashtra BJP president Chandrakant Patil) यांनी केली. आज महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदचा त्यांनी निषेध देखील केला.

हेही वाचा: Maharashtra Bandh : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी मनसेचं संरक्षण!

सत्तेत असताना बंदची हाक देणं ही पहिली घटना आहे. सरकारमधील पक्षांचे कार्यकर्ते दंडुके घेऊन फिरत आहेत. दुकान बंद करण्याची धमकी देत आहेत. आतापर्यंत राज्यात दोन वादळे येऊन गेलीत. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. कर्जमाफी देखील अर्धवट आहे. कोल्हापूर, सांगली, चिपळूणला महापूर आला. पण, अजूनही येथील नागरिकांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करावा, असा सल्ला पाटलांनी यावेळी दिला.

महाविकास आघाडी सरकारने २०१९ ला ज्याप्रमाणे नुकसानभरपाई मिळाली त्याचप्रमाणे यंदा देखील द्यावी. २०१९ जीआर लागू करावा. पण, हे सरकार पंचनामे करत आहे. अतिवृष्टीमुळे पीके आणि घरे आठ-आठ दिवस पाण्याखाली होती. मग हे सरकार कोणत्या गोष्टीचे पंचनामे करतात? असा सवालही त्यांनी उपस्थित करतात.

अजित पवार हे खूप हुशार राजकारणी आहेत. ते एमपीएससीबाबत फसवी घोषणा करतात. जागा निघाल्या असं सांगतात. मात्र, त्या जागा एमपीएससीच्या बोर्डावरील आहेत, असं हळूच सांगितलं जातं. त्याचप्रमाणे अजित पवारांनी वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी घोषणा करू, असे म्हटले. शेतकऱ्यांच्या बाबतीत या सरकारला संवेदनशीलता नाही. लखीमपूरला घडलेल्या घटनेमुळे उत्तर प्रदेशात बंदची हाक नाही. पण, महाराष्ट्र बंद आहे. ऐन नवरात्रीमध्ये तुम्ही बंद केला आहे. त्यामुळे भक्त नाराज आहेत. शेतकऱ्यांना तुम्ही समाधान देऊ शकत नाही. याचे परिणाम सर्वांना दिसणार आहे. या बंदच्या भूमिकेबद्दल निषेध व्यक्त करतो, असेही पाटील म्हणाले.

loading image
go to top