Vidhan Sabha 2019: भाजपमधील स्वबळाचा सूर आणि चंद्रकांत पाटील यांचे 'हे' वक्तव्य

टीम ई-सकाळ
Tuesday, 10 September 2019

भाजपमध्ये स्वबळावर लढण्याचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर युती होणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. आता, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र, शिवसेना-भाजप एकत्र लढणार असल्याबद्दल विश्वास व्यक्त केलाय.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप यांच्यात युती होणार की नाही यायावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा निर्णय दोन दिवसांत होईल, असे सांगितले आहे. तर, भाजपमध्ये स्वबळावर लढण्याचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर युती होणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. आता, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र, शिवसेना-भाजप एकत्र लढणार असल्याबद्दल विश्वास व्यक्त केलाय.

मंत्रिमंडळात झाले 37 मोठे निर्णय; निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन निर्णयांचा धडाका

तर शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी
भाजपमध्ये सध्या विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या करिष्म्याच्या जोरावर राज्यात भाजपला १६० जागा मिळतील, असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे विधानसभा स्वबळावर लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला देण्यात येत आहे. भाजपमध्ये असा विचार असेल तर शिवसेनेच्या वाट्याला १२५ जागा येतील. मात्र, त्या परिस्थितीत शिवसेना स्वतंत्र लढण्याची शक्यता राजकीय गोटातून व्यक्त होत आहे.

सांगली : भाजपची घमेंड उतरवू; युती तोडण्याचा शिवसैनिकांचा इशारा 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा निर्णय दोन दिवसांत होईल, असे सांगितले असले तरी, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी युतीचा फॉर्म्युल्याबाबत चित्र साधारण आठवड्याभरात स्पष्ट होईल, असे स्पष्ट केले आहे. पाटील म्हणाले, ‘युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंतिम निर्णय घेतील. अर्थात याचा अर्थ आम्ही २८८ जागांचा विचार करतोय आणि युती करणार नाही असं अजिबात नाही. युतीचा निर्णय झाल्यानंतरच शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करायचा हे ठरवता येणार आहे. त्याबद्दलचे सगळे अधिकार मला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले आहेत.’ भाजपकडून 34 जिल्ह्यात 34 ज्येष्ठ निरीक्षकांना पाठवण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या अहवालानुसार कोअर कमिटीशी बोलणं करणं आणि इच्छुकांशी चर्चा करण्यात आली आहे. पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती, निवडणूक संचालन समितीची बैठक झाली आहे. सगळ्या जागांवर पहिली दोन तीन नावं कुठली असतील यावर चर्चा झाली आहे. ज्या जागा भाजपच्या वाट्याला येतील त्यासाठीची ही तयारी असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल आणि 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत निवडणुका होतील, असेही पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader chandrakant patil statement on seat sharing with shiv sena