नाक कापून अवलक्षण करू नका; खडसेंचा फडणवीसांना सल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

नाक कापून अवलक्षण करू नका, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज (मंगळवार) दुपारी आपल्याच पक्षाला दिला.

मुंबईः नाक कापून अवलक्षण करू नका, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज (मंगळवार) दुपारी आपल्याच पक्षाला दिला. उपमुख्यमंत्रीपदाचा राजिनामा अजित पवार यांनी दिल्याचे वृत्त येऊन धडकताच खडसे म्हणाले, की राजकारणात दलाल निर्माण झाले आहेत.

खडसे यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्यावर सिंचन गैरव्यवहाराचे आरोप केले होते. खडसे हेच तत्कालिन भाजप-शिवसेना युती तोडण्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात होते. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि सध्याच्या सत्ताकारणाचे भाजपमधील सूत्रधार यांच्यावर टीकेच्या फैरी झाडल्या आहेत.

अजित पवार यांचा राजीनामा अपेक्षित होता. राष्ट्रवादीचा एक गट एककडे आणि अजित पवार दुसरीकडे यामुळे अजित पवार एकटे पडले होते, असे खडसे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते खडसे म्हणाले, भाजपला बहुमत सिद्ध करण्यास अडचण आहे. अजित पवार हे राजीनामा देतील हे अपेक्षित होते. पण, महाराष्ट्राला महिनाभर वेठीस धरले हे दुर्देव आहे. जे प्रयोग सुरू होते, ते योग्य नाही. राष्ट्रवादीचा एक गट एककडे आणि अजित पवार दुसरीकडे यामुळे अजित पवार एकटे पडले होते.

मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे, पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात मी काही बोलणार नाही, असे सांगतच खडसे यांनी भाजपने आता तरी सावरावे, असे नेत्यांना सुचविले.

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणात एकावर एक राजकीय भूकंप घडताना दिसत आहेत. अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आज दिला आहे. केवळ दोन दिवसात अजित पवार यांनी आपल्यात पदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा आपला राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी राज्यपालांकडे केला आहे. राज्यपालांना 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. आता बाळासाहेब थोरात यांच्याकडेच गटनेतेपद देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader eknath khadse advice devendra fadanvis