नाराज खडसे आज दिल्लीत; पक्षश्रेष्ठींना कोणाची करणार तक्रार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

आज एकनाथ खडसे दिल्लीला रवाना झाले आहेत, ते दिल्लीत कोणाशी संवाद साधतात, ते कोणाची भेट घेणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्ह्याट्यावर येताना दिसत आहे. सध्या ओबीसी नेत्यांवर होत असलेल्या अन्यायावरून अनेक नेते भाजपच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. यावरून माजी मंत्री एकनाथ ख़डसे यांनी पक्षातील अनेक नेत्यांवर शरसंधान साधले आहे. प्रामुख्याने त्यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. दरम्यान, आज खडसे दिल्लीला  रवना झाले आहेत ते दिल्लीत कोणाशी संवाद साधतात, ते कोणाची भेट घेणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समोर खडसे यांनी आपल्यावर पक्षातील काही नेत्यांकडून सातत्याने अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली होती. चाळीस वर्षे पक्ष उभारणीत मोठं योगदान असतानाही जर यापुढे ही असेच होत राहिल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराच त्यांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली होती.

या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे हे काल कर्नाटक एक्सप्रेसने दिल्ली येथे रवाना झाल्याने ते दिल्लीत आता कोणाची भेट घेतात आणि कोणत्या विषयावर आपली भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

त्याअगोदर बैठकीला न बोेलावल्याबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, ''उत्तर महाराष्ट्राची बैठक असूनही आपणास यासाठी ३.३० वाजता या, असे सांगण्यात आले. याशिवाय पक्षाच्या कोअर कमिटीतूनही आपणास काढून टाकण्यात आले आहे. मला आता निर्णय प्रक्रियेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. जाणीवपूर्वक मला दूर करण्यात येत असेल तर मी काय भूमिका घेतली पाहिजे. काही लोकांकडून सातत्यानं अपमान होतोय. अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल.'' 

पुढे ते म्हणाले, बहुजन समाज आणि ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्ते आजही आम्हाला अन्याय होत असल्याचं सांगत असतात. ओबीसींवर अन्याय होतो की नाही याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. राज्यातल्या लोकप्रतिनिधी, माजी आमदार यांची जी भावना आहे. ती पक्षाच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आम्हाला जातीवर बोलायाचं नाही, पण जे घडलं आहे ते तर समोर आलंच पाहिजे. 

दरम्यान, भाजपाचा चेहरामोहरा बदलवण्याचं काम मी मधल्या कालखंडात केलं. मुंडे, महाजन, गडकरी, फरांदे आणि अण्णा डांगे असतील. या सगळ्याच नेत्यांनी पक्ष वाढवला आहे. ज्या पक्षांचे दोन खासदार होते, विधानसभेत फक्त 14 आमदार होते. त्या पक्षाला सत्तेवर बसवण्यामध्ये ओबीसी नेत्यांनी केलेली मेहनत विसरता येणार नाही. ओबीसी आणि बहुजन नेत्यांनी जिवाचं रान केल्यानंच पक्ष मोठा झाला. पक्ष मोठा झाला म्हणून नेतृत्व मिळालं आणि पक्षविस्ताराला वाव मिळाला. पक्षविरोधी काम केलेल्यांवर कारवाई केलीच पाहिजे. चंद्रकांत पाटलांकडे मी सर्व कागदोपत्री पुरावे दिलेले आहेत. ते आता योग्य ती कारवाई करतील, असंही खडसे म्हणाले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp leader eknath Khadse in Delhi today