Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन bjp leader Pankaja Munde calls Uddhav Thackeray who is in trouble | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde

Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरूवातीला 40 आमदार आणि त्यानंतर आता पक्षचिन्हही गेल्याने उद्धव ठाकरे अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

एकीकडे भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका करत आहेत, मात्र दुसरीकडे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एक मोठं वक्तव्य केलं आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोललो आहे. मात्र काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांसमोरचा आत्ताचा काळ कसोटीचा आहे. एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो हा मोठा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तर सत्तेत असल्यामुळे आपल्या सोबत असलेल्यांना भविष्यात निवडून आणणं, ही मोठी संधी शिंदे यांच्याकडे आहे. तर दुसरीकडे नावं नसताना पुन्हा आपला पक्ष उभ करण्याचं मोठं आवाहन उद्धव ठाकरे यांच्यासामोर असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे.

त्याचबरोबर आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो, मात्र काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही म्हणत पंकजा यांनी सत्ता संघर्षावर विस्तृत बोलण्याचं टाळलं. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर भाजपच्या राज्यसह केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अशातच, पंकजा मुंडे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली, असा गौप्यस्फोट केल्यामुळे बड्या राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची प्रचाराचा धुरळा सुरू आहे. चिंचवडमधील भाजपच्या उमेदवार आश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बोलताना हे सूचक वक्तव्य केलं आहे.