
Shivsena : ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये! 'या' प्रकरणात ठोठावणार सुप्रीम कोर्टाचे दार
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला दिल्यामुळं ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्यावतीनं सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. या निर्णयावर स्टे आणण्यासाठी ठाकरे गट प्रयत्न करणार आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची आज तातडीची बैठक बोलवली आहे. सकाळी 9.30 वाजता बाळासाहेब भवन येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत कार्यकरणी कधी बोलवायची ? आयोगाच्या निकालानंतर पुढची रणनिती काय असेल यावर चर्चा होणार आहे. शिंदे गटात सध्या उत्साहाचे वातावरण दिसून येत असून त्यांची पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
तर सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी उद्यापासून सलग तीन दिवस पार पडणार आहे. यावेळी कोर्ट काय निर्णय घेणार आणि आयोगाच्या पक्ष नाव आणि चिन्ह या निर्णयात हस्तक्षेप करणार का याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.