विधानसभेत भाजपचं 'अबकी बार, २२० पार'!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बैठक घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे युतीच्या उमेदवारांचे काम करावे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसला पाहिजे, यासाठी युतीच्या 220 जागांसाठी कार्यकर्ते पूर्ण क्षमतेनिशी काम करणार आहे.

नाशिक : युतीत मतभेद नाही. "ये दोस्ती हम नहीं तोडेंगे,' असे म्हणत "अबकी बार 220 पार' या न्यायाने एकदिलाने काम करून राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या 220 जागा निवडून आणायचा आमचा निर्धार आहे. आमचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भाजप कार्यकर्त्यांना तशा स्पष्ट सूचनाच आहेत. त्यामुळे राज्यात आगामी मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असा दावा राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

नाशिक विभागातील वृक्ष लागवडीच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने ते आले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ""भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बैठक घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे युतीच्या उमेदवारांचे काम करावे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसला पाहिजे, यासाठी युतीच्या 220 जागांसाठी कार्यकर्ते पूर्ण क्षमतेनिशी काम करणार आहे.'' 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला शुभेच्छा 
मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अतिशय जबाबदारीने विरोधी पक्षाचे कामकाज पाहत आहे. त्या पक्षाला आजच्या वर्धापनदिनी मी त्यांना शुभेच्छा देतो. पुढील 25 वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसने अशाच पद्धतीने जबाबदारीने विरोधी पक्षाचे काम करीत राहावे, या माझ्याकडून त्या पक्षाला शुभेच्छा. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका केली. "ईव्हीएम'बाबत काका-पुतण्यात एकमत झाले, तर ते लोकशाहीसाठी पोषक राहील, अशी टीका त्यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Sudhir Mungantiwar claims BJP wins 220 seats in assembly election