esakal | राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते - भाजप नेत्याचं वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

फडणवीस, शेलार

राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते - भाजप नेत्याचं वक्तव्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘‘महाविकास आघाडीचे सरकार झोलबाज, धोकेबाज, दगाबाजांचे सरकार आहे. दगाबाजीतून स्थापन झालेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचे आपल्या कुलदैवत असलेल्या परिसराकडेही लक्ष नाही. ते राज्याच्या विकासासाठी कसे लक्ष देतील,’’ असा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. महाविकास आघाडीत विसंवाद आहे, दोन्ही पक्षांचे तसे संकेत मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडून राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते. मात्र, मावळचा यापुढचा आमदार भाजपचा असेल,’’ असा आशावाद शेलार यांनी केला.

मावळ येथे ‘समर्थ बूथ अभियान बूथ अध्यक्ष सन्मान’ सोहळ्यात शेलार उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भास्करराव म्हाळसकर, धर्मेंद्र खांदवे, उपसभापती दत्तात्रेय शेवाळे, माऊली शिंदे, सुकन बाफना, राजाराम शिंदे उपस्थित होते.

आशिष शेलार म्हणाले, ‘‘बूथ प्रमुखांना लढवय्या वीरांची भूमिका बजावावी लागेल. बूथ जिंका, राज्य जिंकणे सोपे, बूथ प्रमुख भाजपचा पाया आहे. तोच यशाचा मानकरी आहे. आपला बूथ आपले क्षेत्र. मतदारयादी आपली गीता आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते, प्रदेशाध्यक्ष हे बूथ प्रमुख आहेत. त्यामुळे बूथ प्रमुखांना कमी लेखू नका. महाविकास आघाडीचे सरकार ओरबाडून घेण्याचे काम करतात तर मोदी सरकार देण्याचे काम करतात.’’ ‘मोदी हे तो मुमकिन है’, अशी टिप्पणी करून शेलार म्हणाले, ‘‘राज्याचे गृहमंत्री आणि कमिशनर वॉण्डेड आहेत. हे सरकार मंत्री चालवत नाही. सरकार दलाल चालवत आहे. हे दलालांचे सरकार आहे.’’

बाळा भेगडे म्हणाले, ‘‘पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाने चुकीचा आराखडा आखला आहे. सत्ताधारी यावर बोलत नाही. पीएमआरडीच्या संघर्षाची लढाई सुरू करू, तोंड बघून आरक्षणे टाकण्यात आले आहेत. या पुढच्या सर्व निवडणुका भाजप जिंकेल. पुणे जिल्हा बँकेचा संचालकही भाजपचा असेल.’’ संदीप काकडे यांनी स्वागत केले. रवींद्र भेगडे यांनी प्रास्ताविक केले. सुनील चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. मच्छिंद्र केदारी यांनी आभार मानले.

loading image
go to top