
मंत्रिपद पुन्हा डावलल्याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, कदाचित...
मुंबई : अखेर शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी सकाळी करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही यावरून सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या दरम्यान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की आज राखी पोर्णिमा आहे, त्यामुळे मी कुठलंही रक्षा कवच मोडणार नाही. मी सर्व मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेवटी कोणत्याही संख्येचं मंत्रिमंडळ बनवायचं असतं त्यामध्ये सर्वांना समाधानी करता येत नाही. त्यामुळे जे लोकं मंत्री झाले आहेत त्यांनी तरी लोकाना समाधानी करावं असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा विषय पुन्हा दुर्लक्षीत झाला आहे, या सरकारकडून हे अपेक्षीत नाही, या सरकारने ते जोरदार प्रयत्न करुन ते मिळवावं.
राज्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी वारंवार पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येतं पण त्यांना मंत्रिपद दिलं जात नाही, याबद्दल त्यांना विचारले असता मुंडे म्हणाल्या की, कदाचित मग तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेची लोक असतील. माझी पात्रता नसेल, ती वाढेल. त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. मिडीयातून, कार्यकर्त्यांमधून चर्चा होतात, आता कार्यकर्ते शांत बसलेत, मी पण शांतपणे बसले आहे. त्यांना जेव्हा वाटेल ज्याची पात्रता आहे, तेव्हा ते देतील त्यामुळे त्यात माझा रोल असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने आणि इज्जतीने राजकारण करते, तेच करण्याचा माझा प्रयत्न राहील असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
तसेच पुढे बोलताना त्यांनी पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिलेला स्थान असलीच पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या, तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल बोलण्याचे मात्र पंकडा मुंडे यांनी यावेळी टाळले.