विरोधी आमदार फोडण्याचा भाजपचा काय आहे 'प्लॅन बी'? 

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 24 November 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज बंड केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांवर बारीक नजर ठेवण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापन्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रयत्न सुरू केले असतानाच या तिन्ही पक्षांचे आमदार फोडण्याचा भाजपने "बी प्लॅन' तयार केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज बंड केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांवर बारीक नजर ठेवण्यात आली आहे.

राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठका गेल्या महिनाभरापासून सुरू होत्या. या कालावधीत भाजप नेते काहीही न बोलता पडद्यामागून कार्यरत होते. शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 13 तर कॉंग्रेसचे 9 आमदार भाजपने हेरले होते. जे आमदार कर्जबाजारी आहेत, असे आमदार गळाला लागू शकतील असे गृहीत धरून भाजपने त्यांना संपर्क करत मोठ्या रकमेचे आमिष दाखवल्याची चर्चा होती. मात्र निवडणुकीआधी फुटलेल्या नेत्यांचा झालेला पराभव आणि सत्ता स्थापन्याच्या घडामोडींवर शरद पवार यांचे संपूर्ण नियंत्रण असल्याने या आमदारांनी सबुरीने घेण्याचा निर्णय घेतला होता. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना कुणकुण लागल्याने कॉंग्रेसने आपले आमदार सुरुवातीला जयपूर आणि शिवसेनेने त्यांचे आमदार मुंबईतील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले होते.

दरम्यान, तिन्ही पक्षांच्या सत्ता स्थापण्याची दिशा स्पष्ट झाल्याने शिवसेना आणि कॉंग्रेसच्या आमदारांची सुटका करण्यात आली. तोपर्यंत सत्तेतील वाट्यावरून अजित पवार यांनी आज बंड केल्याने तिन्ही पक्षांचे धाबे दणाणले. अजित पवार यांच्यासोबत 10 ते 11 आमदार सकाळी गेले होते. मात्र आज दिवसभरात अनेक नेते स्वगृही परतले असताना अजित पवार यांच्यासोबत सध्या 5 ते 6 आमदार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, शिवसेनेने आपले आमदार पुन्हा विमानतळाजवळील ललित हॉटेलमध्ये ठेवले असून, कॉंग्रेसच्या आमदारांना कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या मध्य प्रदेशातील भोपाळ येथे हलविले आहे. 

-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांचा वॉच 
-शिवसेनेचे आमदार मुंबई विमानतळावरील ललित हॉटेलमध्ये 
-कॉंग्रेसचे आमदार भोपाळला रवाना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp plan b for getting mla from other parties maharashtra government