Sanjay Raut | राज्याच्या भूगर्भात मुंबई तोडण्याच्या हालचालींना वेग; राऊतांचा भाजपावर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut on Nagpur Visit
राज्याच्या भूगर्भात मुंबई तोडण्याच्या हालचालींना वेग; राऊतांचा भाजपावर आरोप

राज्याच्या भूगर्भात मुंबई तोडण्याच्या हालचालींना वेग; राऊतांचा भाजपावर आरोप

महाराष्ट्राच्या स्थापनेला आज ६२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आपल्या रोखठोक या सदरातून महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. जे अखंड हिंदुस्थानचे फक्त स्वप्न दाखवतात, तेच महाराष्ट्राचे खरे शत्रू असं विधानही त्यांनी केलं आहे. त्यासोबतच मुंबई कोणाची या प्रश्नाचा उहापोह करताना मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या हालचालींना वेग आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र आज कधी नव्हे इतका अशांत आणि अस्थिर झाल्याची खंतही त्यांनी या लेखातून बोलून दाखवली आहे. तसंच लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते, मात्र त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच निमंत्रित करण्यात आलं नव्हतं, याबद्दलची नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे. मराठी नेते काँग्रेस काळात नव्हते, त्यापेक्षा जास्त दिल्लीचे गुलाम झालेत, असंही ते म्हणाले आहेत.

मुंबई कोणाची?

मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत हालचालींना वेग आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राऊत म्हणाले, "इतक्या वर्षांनंतरही मुंबई कोणाची असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे. पण आधी महाराष्ट्राची आहे म्हणून हिंदुस्थानची आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची कारस्थाने पूर्णपणे संपलेली नाहीत."

राऊत पुढे म्हणतात,"आधी मुंबईचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करायचं आणि एका बेसावध क्षणी मुंबई केंद्रशासित करायची. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महाराष्ट्रातील भाजपास या सगळ्याची पूर्ण कल्पना आहे. फडणवीस यांनी मुंबईत जे अमराठी पंचक निर्माण केलंय, त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कशी करता येईल याचं एक प्रेझेंटेशन तयार करून ते गृहमंत्रालयाला सादर केलंय. विक्रांत घोटाळ्यातील आरोपी व त्यांच्या अमराठी बिल्डर साथीदारांकडे त्या मोहिमेची सूत्रे आहेत. एका बाजूला आपण महाराष्ट्र दिन साजरा करायचा व त्याचवेळी महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत हालचालींना वेग यावा, हे बरे नाही."

टॅग्स :Sanjay Raut