गद्दारी सहन करणार नाही,पाडापाडीला थारा नाही : नारायण राणे ; Narayan Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायण राणे

गद्दारी सहन करणार नाही,पाडापाडीला थारा नाही : नारायण राणे

सावंतवाडी (सिंधुदु्र्ग) : पक्षात प्रत्येकाला पद मिळते; मात्र एकाला मिळाल्यास त्याला पाडायचा प्रयत्न करू नका. तुम्ही हक्काने मागा मी पद नक्की देईल; मात्र गद्दारी केल्यास ते मी सहन करणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात सावंतवाडी (Sawantwadi)तालुका भाजपमय (BJP)करण्यासाठी पक्षाचे काम तळागाळात पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane)यांनी आज येथे केले.

सावंतवाडी तालुका माझा आवडता आहे; मात्र सावंतवाडी, कुडाळ (Kudal)या दोन आमदारांसह लोकसभेचा खासदार आपला नाही याचे शल्य आहे. त्यामुळे आगामी काळात तिन्ही जागा ताब्यात घेण्यासाठी कामाला लागा, अशा सूचनाही राणे यांनी केल्या.

शहरातील आदिनारायण मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, प्रमोद कामत, पुखराज पुरोहित, अजय गोंदावळे, अंकुश जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा: अफगाणवर संकट ; परराष्ट्र मंत्र्यांनी मालमत्ता मुक्तीची अमेरिकेकडे केली मागणी

यावेळी राणे म्हणाले, ‘‘या जिल्ह्यात इन्फ्रास्ट्रक्चर, शाळा, वीज, पाणी, पायाभूत सुविधा मी दिल्या. या जिल्ह्यातील वाडी-वस्तीवर रस्ते देण्याचे काम केले; मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. वाडी वस्तीवरील रस्तेच गायब झाले असून रस्त्यांना निधी नाही. चिपी विमानतळाचे बांधकाम माझ्या कार्य काळामध्ये २०१४ मध्ये पूर्ण झाले होते; मात्र ते सुरू करण्यासाठी आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना २०२१ उजाडले हे दुर्दैव आहे."

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यामध्ये धमक आहे का?

राणे पुढे म्हणाले, "मी आमदार असताना विधानसभा गाजवली. एक इतिहास निर्माण केला. कोकणातील बुद्धिमत्ता कशी आहे, ही महाराष्ट्रातील आमदारांना दाखवून दिली; मात्र आत्ताचे इथले आमदार नेमके काय बोलतात हेच समजत नाही. गावचा सरपंच सुद्धा इथल्या आमदारापेक्षा चांगला बोलतो. जिल्हा नियोजनमध्ये कोणते विषय केव्हा बोलायचे हे सुद्धा यांना माहीत नाही. मुख्यमंत्री असताना मुंबईवर गुंडांची दहशत होती. पाकिस्तानातून मुंबईवर हल्ले होत होते; मात्र असे असताना सुद्धा ती दहशत मी मोडून काढली.

आत्ताच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यामध्ये ती धमक आहे का? त्यामुळे देशाचे संरक्षण करणारे देशाची कीर्ती जगभर पोहोचवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा पक्ष वाढल्यास महाराष्ट्र नक्कीच विकसित होईल. त्यासाठी पदासाठी नाही तर आपापसात मतभेद न राहता प्रत्येकाने एकोप्याने काम करा. एकाला पद मिळाल्यास त्याला पाडण्याचा प्रयत्न करू नका. पद हवे असल्यास हक्काने मागा; मात्र गद्दारी केल्यास ती सहन केली जाणार नाही."

तालुक्यातील सर्व जागा काबीज करा

भाजपचे काम गावागावांमध्ये पोचवून सावंतवाडी तालुक्यातील सर्व सत्तास्थाने आगामी निवडणुकीत काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल; मात्र तालुका भाजपमय झाला पाहिजे, अशा सूचनाही नारायण राणे यांनी यावेळी केल्या.

loading image
go to top