Vidhan Sabha 2019 : अशोक चव्हाणांना घेरण्याची भाजपची रणनीती 

दयानंद माने
Wednesday, 2 October 2019

काँग्रेसचा बालेकिल्ला जमीनदोस्त करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यांना शिवसेनेची साथ लाभणार आहे. ‘वंचित’ची कामगिरी कशी असेल, हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जिल्ह्यात चुरस आहे.

विधानसभा 2019 
काँग्रेसचा बालेकिल्ला जमीनदोस्त करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यांना शिवसेनेची साथ लाभणार आहे. ‘वंचित’ची कामगिरी कशी असेल, हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जिल्ह्यात चुरस आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्ह्यातील विधानसभेच्या भोकर मतदारसंघातून रिंगणात उतरत आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयाने खासदार झालेले प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उत्साह दुणावलेला आहे. त्याच्या भरात भाजप नेत्यांनी जिल्ह्यातील सर्व नऊही जागा जिंकण्याचा मनसुबा जाहीर केलाय. हे करताना मित्र शिवसेनेच्या चार आमदारांच्या जागाही विसरल्या गेल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत याचा कहर झाला. आदेश दिलात तर सर्व जागांवर भाजपला निवडून आणू, असा शब्द चिखलीकरांनी मुख्यमंत्र्यांना दिला. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीचा पट रंगतोय.

२०१४ मध्ये विद्यमान दोन्ही आघाड्यांतील पक्ष स्वतंत्रपणे लढले. यात शिवसेनेने नांदेड दक्षिण, हदगाव, लोहा आणि देगलूर, काँग्रेसने नांदेड उत्तर, भोकर आणि नायगाव, तर भाजपने मुखेड आणि राष्ट्रवादीने किनवट जिंकले होते. जवळपास निम्मी ताकद दोन्ही आघाड्यांमध्ये विभागली गेली. आता भाजपने काँग्रेसचा हा बालेकिल्ला पटकावण्याचा प्रयत्न चालवलाय. आघाडीकडून काँग्रेस सात, तर राष्ट्रवादी दोन जागांवर लढणार आहे. युतीत शिवसेना चार, तर भाजप पाच जागा लढणार आहे. मात्र जाहीर यादीनंतर शिवसेना आणि भाजपच्याही अनेक इच्छुकांना तडाखे बसू लागलेत.    

अशोक चव्हाण भोकरमधून लढणार असून, भाजपने माजी आमदार बापूसाहेब गोरठेकरांना, तर ‘वंचित’ने नामदेव आईलवारांना उमेदवारी दिली आहे. हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४,७८६ मतांचीच आघाडी आहे. ते चव्हाणांसाठी चिंताजनक आहे. मुख्यमंत्रिपदाच्या काळातील कामाच्या बळावर आपण विजय मिळवू, असा त्यांना विश्वास वाटतोय. चिखलीकरांनी गोरठेकरांना येथून उमेदवारी मिळवून दिली आहे. चव्हाण यांना खिळवून ठेवण्याची ही रणनीती आहे. नांदेड उत्तर हा काँग्रेसचे माजी मंत्री डी. पी. सावंत यांचा मतदारसंघ. या वेळी विजयी झाल्यास ते हॅटट्रिक साधतील. येथे लोकसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसला मिळालेली तीस हजार मतांची आघाडी त्यांची चिंता दूर करत आहे. शिवसेनेकडून अचानकपणे निष्ठावंतांना डावलून ओमप्रकाश पोकर्णांचे नाव चर्चेत आल्याने निष्ठावान अस्वस्थ आहेत. नांदेड दक्षिणमध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली. ‘वंचित’कडून फारूक अहमद उमेदवार असतील. येथे काँग्रेसचा उमेदवार अनिश्‍चित आहे. नांदेडमधील उत्तर आणि दक्षिण या दोन्हीही जागांवर शिवसेना आणि भाजपची खेचाखेची होती. मात्र, शिवसेनेने एक जागा राखली आणि एक भोकरच्या बदल्यात मिळविली. भाजपच्या इच्छुकांत तीव्र नाराजी आहे.  

नायगावमधून आमदार वसंत चव्हाण सलग तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. येथे भाजपकडून डॉ. मीनल खतगावकर आणि राजेश पवार यांच्यात काट्याची लढत असेल. ‘वंचित’कडून मारुती कवळेंना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसला लढत कठीण असेल. शिवसेनेचे दोन आमदार सुभाष साबणे (देगलूर) आणि नागेश पाटील आष्टीकर (हदगाव) पुन्हा नशीब आजमावतील. मुखेडमध्ये भाजपने एकमेव आमदार डॉ. तुषार राठोड यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. किनवटमधून राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक आणि भाजपच्या उमेदवारांत काट्याची लढाई होईल. नाईक हॅटट्रिकच्या तयारीत आहेत. चिखलीकर लोहामधून मुलासाठी उमेदवारी मिळवतील काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

‘वंचित’कडे लक्ष
लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवाराने एक लाख ६६ हजार मते मिळवून काँग्रेसला घाम फोडला होता. त्यामुळे या वेळी ‘वंचित’कडे सगळ्यांचे लक्ष असेल. मात्र यंदा त्यांना ‘एमआयएम’ची साथ नाही. ‘एमआयएम’ही आपला उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे दलित आणि मुस्लिम मत विभाजनाचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसणार की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's strategy to capture Ashok Chavan