कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्तदात्यांनी फिरवली पाठ 

मिलिंद तांबे
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोनाच्या धास्तीने नागरिक रक्तदान करण्यास तयार नसल्याचे रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा शक्‍य होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

मुंबई - कोरोना प्रादुर्भावाचा फटका मुंबईतील रक्तपेढ्यांना बसला असून, रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जमावबंदी लागू झाल्याने रक्तदान शिबिरे घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरिक रक्तदान करण्यास तयार नसल्याचे रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा शक्‍य होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुंबईतील काही रुग्णालयांच्या रक्तपेढ्या आहेत. त्याचप्रमाणे खासगी रक्तपेढ्यांमधून रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा केला जातो. रक्तदान शिबिरे व वैयक्तिक रक्तदात्यांच्या माध्यमातून रक्तपेढ्यांमध्ये रक्त, प्लेटलेट् आणि प्लाझ्मा यांचे संकलन केले जाते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर रक्तदान शिबिरे घेण्यावर बंदी आल्याने दररोजचे रक्तसंकलन पूर्णतः बंद झाले आहे. 

मुंबईतील खासगी रक्तपेढ्यांमधून महिन्याला तीन ते चार रक्तदान शिबिरे घेतली जातात आणि साधारणत: 800 बाटल्या रक्त संकलित केले जाते. सध्या जमावबंदी असल्याने रक्तदान शिबिरे घेण्यावर निर्बंध आले असून, आधीचा रक्तसाठा संपला आहे. दररोज 30 ते 40 व्यक्तींकडून वेगवेगळ्या गटांतील रक्ताची मागणी होते. आता साठा संपल्याने रक्तपुरवठा करू शकत नाही, असे ब्लडलाईन चॅरिटेबल ब्लड बॅंकेचे प्रमुख योगानंद पाटील यांनी सांगितले. 

रक्तदान शिबिरांत संकलित झालेल्या रक्तातून आवश्‍यकतेनुसार प्लाझ्मा आणि प्लेटलेट हे घटक वेगळे काढले जातात. प्लेटलेट केवळ पाच दिवस साठवता येतात. मलेरिया, डेंगी, टायफॉईड अशा अनेक गंभीर आजारांत रुग्णांना प्लेटलेटची आवश्‍यकता असते. साठा संपल्यामुळे प्लेटलेटचा पुरवठा करणे अवघड झाले आहे. भाजलेल्या अनेक रुग्णांना प्लाझ्माची गरज भासते. त्याचाही साठा 10 ते 12 दिवस पुरेल इतकाच आहे, अशी माहिती सायन ब्लड बॅंकेच्या प्रमुख निकिता सोनवणे यांनी दिली. 

सध्या केवळ 15 ते 20 टक्के रक्तसाठा असून, एप्रिल ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत तोही संपेल. त्यामुळे मे महिन्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासण्याची शक्‍यता आहे, असे गोवंडीतील पल्लवी ब्लड बॅंकेचे प्रमुख भीमराव काळे यांनी सांगितले. रक्तदान शिबिरांवर बंदी असली, तरी नागरिक वैयक्तिकपणे रक्तदान करू शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

सद्यःस्थिती 
रक्तसाठा : 15 ते 20 टक्के 
प्लाझ्मा : 10 ते १२ दिवस पुरेल इतकाच 
प्लेटलेट : साठा संपला 

रक्तदान केल्यामुळे कोरोना संसर्गाचा कोणताही धोका नाही. कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा उद्‌भवू शकतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करावे. 
- डॉ. पार्थिव संघवी, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blood shortage in Blood bank

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: