

police security
ESakal
तात्या लांडगे
सोलापूर : दिल्लीत बॉम्बस्फोट झाल्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील १०० हून अधिक लॉज, हॉटेल, गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड परिसरात तपासणी सुरू केली आहे. ग्रामीणमधील २५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात पाकणी येथे इंधन साठ्याचा प्रकल्प आहे. याशिवाय गॅस सिलिंडरचाही प्रकल्प आहे. मोठ्या मंदिरांचा (सर्व मर्मस्थळे) परिसर देखील तपासला जात आहे. हॉटेल, लॉजमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची माहिती, तेथील रजिस्टरही पडताळून पाहिले जात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर, ग्रामीणमधील २५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी रात्रीपासून नाकाबंदी लावण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली. शहरातील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिसांकडूनही सुरक्षेच्या कारणास्तव गर्दीच्या ठिकाणांची तपासणी सुरू आहे. त्यासाठी ड्रोनचा देखील वापर केला जात आहे. बॉम्ब शोधक पथक, श्वान पथकाचीही त्यासाठी मदत घेतली जात आहे.
दोन दिवसांपासून तपासणी
दिल्लीत बॉम्बस्फोटाची घटना घडल्यावर सगळीकडे अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यादृष्टीने सोमवारी व मंगळवारी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल, लॉजची तपासणी केली आहे. याशिवाय रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, श्री सिद्धेश्वर मंदिर अशा ठिकाणी देखील तपासणी सुरू आहे.
- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
पंढरपूर, अक्कलकोट मंदिराजवळ सुरक्षा
दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिर, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. तसेच पोलिसांकडून ड्रोनचा देखील वापर केला जात आहे. बॉम्ब शोधक पथक, श्वान पथकांकडून त्या ठिकाणचा परिसर तपासला जात आहे.
जुबेरला बोलावणाऱ्या संघटनेतील सदस्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष
‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगरगेकर यास पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. तो मूळचा सोलापूर शहरातील असून सोलापुरातील अनेकजण त्याच्या संपर्कात होते. जुबेरला ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात कार्यक्रमासाठी बोलावले होते, त्या संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर देखील पोलिसांचे विशेष लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.