बोरामणी विमानतळ; अजितदादांनी दिले वन जमिनीचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्याचे आदेश 

संतोष सिरसट 
Tuesday, 15 September 2020

बोरामणी विमानतळाबाबत ठोस काहीच नाही 
आज मुंबईत झालेल्या बैठकीतून ठोस असे काहीच हाती लागलेले नाही. कोरोनामुळे निधीची अडचण झाली आहे. वन जमितीच्या संपादनाबाबत तो प्रस्ताव त्वरित मंजूर करुन घेण्याच्या सूचना बैठकीत दिल्या, एवढेच काहीतरी सकारात्मक म्हणता येईल. 

सोलापूर ः बोरामणी येथील विमानतळासाठी आवश्‍यक असलेली वनखात्याच्या जमिनीचा प्रस्ताव विभागाच्या प्रधान सचिवांनी नागपूरला पाठवून ताबडतोप मंजूर करुन घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. 

बोरामणी विमानतळाबाबत आज मुंबईत श्री. पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर श्री. पवार यांनी यापूर्वीच खासगी जमिनीचे संपादन व इतर कामंसाठी 50 कोटी रुपये मंजूर केले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मुंबई येथे झालेल्या बैठकीसाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार संजय शिंदे, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. चक्रवर्ती, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, वल्सा नायर, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापक दीपक कपूर उपस्थित होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे व्हीसीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. 

चालू आर्थिक वर्षात राज्यातील विमानतळांसाठी 78 कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर काटकसरीच्या उपाययोजना म्हणून 78 कोटी रुपयांपैकी 25 कोटी रुपयांचा निधीच विमानतळासाठी मिळणार असल्याचे अर्थ विभागाने स्पष्ट केले आहे. हा मिळणारा निधीही शिर्डी व अमरावती (बलोरा) विमानतळासाठी खर्च करण्याचे नियोजन या विभागाने केले असल्याचेही आज झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boramani Airport; Ajit Pawar orders approval of forest land proposal