
तात्या लांडगे
सोलापूर : चुलत वहिनीसोबतच्या प्रेमसंबंधात बुडालेल्या प्रियकराने अनोळखी मनोरुग्ण महिलेला गावात आणले आणि घटनेच्या दिवशी खून करून कडब्याच्या गंजीत मृतदेह ठेवून पेटवून दिले. या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी प्रियकर-प्रेयसीला अटक करून मंगळवेढा न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायाधीश मेघा माळी यांनी दोन्ही संशयितांना २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पाटखळ येथील निशांत सावत (वय २०) याच्या घराशेजारील चुलत वहिनी किरण सावत (वय २३) हिच्याबरोबर प्रेमसंबंध होते. काही महिन्यानंतर त्यांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा डाव आखला. त्यासाठी निशांतने पंढरपूर परिसरातून एक मनोरुग्ण महिला गावाकडे आणली. सोमवारी (ता. १४) तिचा गळा दाबून खून केला व घराजवळील कडब्याच्या गंजीत मृतदेह टाकून गंज पेटवून दिली. त्यात किरणने आत्महत्या केल्याचीही अफवा त्याने पसरवली. मृतदेह किरणचाच असल्याचे भासविण्यासाठी निशांतने किरणचा मोबाईल मृतदेहासोबत टाकला होता. त्या मोबाईलच्या ‘सीडीआर’वरून (कॉल डिटेल्स रिपोर्ट) पोलिसांनी निशांतला ताब्यात घेतले आणि त्याच्याच माध्यमातून किरणलाही कराड परिसरातून पकडले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे तपास करीत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे व पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर, विजय पिसे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
दोघांनीही प्रेमसंबंधांतून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात मान्य केले आहे. संशयित आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन शोधायचे आहे व मयत महिला अनोळखी असल्यामुळे तिचा डीएनए शोधण्यासाठी आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या तपासासाठी पोलिसांनी संशयितांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यावरून न्यायालयाने त्यांना २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. संशयित आरोपींकडून अॅड. डी. एस. माने व अॅड. ऋषिकेश क्षिरसागर यांनी काम पाहिले.
किरणच्या सासरच्यांना गुंतविण्याचा होता डाव
मुलीने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने तिच्या माहेरच्यांनी किरणच्या पतीला आत्महत्येला जबाबदार धरून मारहाण केली होती. मुलीच्या आत्महत्येस सासरचेच जबाबदार असल्याचेही त्यांचे मत झाले होते. निशांत व किरण या दोघांना असेच अपेक्षित होते. किरणच्या आत्महत्या प्रकरणात तिचे सासरचे तुरुंगात जातील आणि आपण कायमस्वरूपी एकत्र राहू शकतो, असा त्यांनी प्लॅन केला होता अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, बुधवारी (ता. १६) पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्या अनोळखी मनोरुग्ण महिलेवर अंत्यसंस्कार केले.
आई-वडिलांची लाडकी किरण; बदनामी नको म्हणून आखला डाव
माहेरील कौटुंबिक स्थिती उत्तम असलेली किरण आई-वडिलांची लाडकी होती. आपण पळून गेल्यावर त्यांची समाजात बदनामी नको म्हणून तिने निशांतसोबत एक प्लॅन आखला. निशांतने मनोरुग्ण महिलेला आणून जाळले आणि किरण असल्याचे भासवले. घटनेच्या दिवशी किरण व तिच्या पतीमध्ये किरकोळ भांडण झाले होते. तिने आत्महत्या केल्याची खबर मिळताच किरणच्या माहेरील सगळेजण पाटखळ येथे दाखल झाले. त्यांनी किरणच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. पोलिसांनी तिच्या घरात जाऊन पाहिले, पण भांडण झाल्यासारखे काहीही दिसत नव्हते.
पोलिसांचा सबुरीचा सल्ला अन् सत्य झाले उघड
किरणच्या माहेरील लोक तिच्या सासरच्यांविरूद्ध आक्रमक झाले आणि त्यांनी किरणचा पती व सासरच्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावेळी कोणीही आत्महत्या करताना स्वत:चा मोबाईल जवळ ठेवत नाही. स्वत: जळत असताना तो व्यक्ती शांत पडून राहत नाही. पण, कडब्याच्या गंजीत जळालेली महिला पोलिसांना झोपलेल्या स्थितीत दिसली. तिच्या अंगावर मोबाईल होता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी किरणच्या मोबाईलचे ‘सीडीआर’ काढले. तत्पूर्वी, पोलिसांनी किरणच्या माहेरील लोकांना गुन्हा दाखल करण्यापूर्वी समजावून सांगितले. त्यांनीही पोलिसांचे ऐकले आणि पोलिसांवर लक्ष ठेवून असलेल्या निशांतवरील संशय बळावला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले. कराड येथील ज्वेलरी शॉपमध्ये कामाला असलेला निशांत या प्लॅनसाठी २० दिवसांपूर्वी पाटखळ येथे आला होता. पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारणा केल्यावर तो बोलला आणि सत्य उघड झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.