
सोलापूर : धर्मज्ञानापासून कोसोदूर असणाऱ्या आणि गावच्या रीती, रिवाज, परंपरांच्या नावाखाली अंधश्रद्धेत गुरफटलेल्या लोकांमध्ये धर्मज्ञानाचा प्रसार व प्रचार करून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी श्री. वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या नेतृत्वाखाली १९४३ साली बाळीवेस येथील मठात मद्विरशैव गुरुकुल पाठशाळेची आणि सिद्धलिंग आश्रम येथे वसतिगृहाची सुरवात केली. धर्म समजून घेण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षणातून सुशिक्षित समाज घडविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सर्वप्रथम त्यांनी सुरू केली होती. या चळवळीच्या माध्यमातून लोकांना अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत शिक्षणावरील श्रध्दा वाढविली. त्यानंतर १९५९ ला बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने मागासवर्गीयांसाठी फताटेवाडी येथे शाळा सुरू केली. आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली या तीन राज्यांमध्ये ५१ शाखेतून आठ दशकांपासून शिक्षणाचे कार्य अविरतपणे सुरू असल्याची माहिती श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी यांनी दिली.
संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी यांनी सकाळ कार्यालयाला भेट दिली. यावेळी सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने आठ दशकांपासून सुरू असलेल्या शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक कार्याची माहिती शांतय्या स्वामी यांनी दिले. श्री वीरतपस्वी चन्नवीर महास्वामी यांनी १९४३ मध्ये सुरू केलेल्या गुरुकुल पाठशाळेपासून ते प्राथमिक, हायस्कूल, बी.ए., बी.कॉम, बीएस्सी महाविद्यालय, डी.एड, बी.एड, तंत्रशिक्ष्ण, संस्कृत पाठशाला अशी संस्थेची यशस्वी वाटचालीतून तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत केले. याची धुरा जगद॒गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य हे सक्षमपणे सांभाळत आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकूण मराठी, कन्नड आणि इंग्रजी माध्यमांतील ५१ शिक्षणसंस्था आहेत. कर्नाटकात कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा आहेत. तर दिल्लीत संगमविहार येथे मठ असून संस्कृत पाठशाळा सुरू करण्यात येत आहे. या शिक्षणाबरोबर विविध पूजा संस्कार देणारी वैदिक प्रशाला आहे. त्यामध्ये प्रत्येक वर्षी १५० बटू शिक्षण घेतात. शिक्षणाबरोबर सामाजिक कार्यात संस्थेचे मोठे योगदान आहे.
दुष्काळामध्ये नागरिकांना मठातून पाण्याची सोय करून दिली होती. गोशाळामध्ये १५० गायींची सेवा, भक्तांसाठी दासोह सेवा, रक्तदान शिबिर, वैदिक शिबिर, बौद्धिक व्याख्यानमाला, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृती वाटप असे वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच जिल्ह्याच्या धार्मिक कार्यात सिंहाचा वाटा राहिला आहे. होटगी येथील श्री बृहन्मठ होटगी मठ, श्री वीरतपस्वी मंदिराची उभारणी केली. संस्थेची भविष्यातील वाटचाल ही सेंद्रिय शेती आणि आरोग्य सुविधांवर असणार आहे. त्यासाठी तपोरत्नं हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज, शेती कॉलेज, विस्तारित गोशाळा, गरिबांसाठी लघु उद्योग सुरू करण्याचे मानस असल्याचे संस्था सचिव शांतय्या स्वामी यांनी यावेळी सांगितले.
संस्थेचे १५० बटू बनले मठाधीश
श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या अंतर्गत सुरू असलेले वैदिक शिक्षण, गुरुकुल पाठशाळा, उन्हाळी सुट्यातील रुद्राध्ययन, ज्योतिष योग शिबिरात आतापर्यंत दहा हजार बटूंनी शिक्षण घेतले. त्यातील १५० बटू हे जगभरातील विविध मठाचे मठाधीश बनले आहेत. त्यामध्ये यापूर्वी काशी पीठाचे जगद॒गुरु श्री चंद्रशेखर शिवाचार्य आणि जगद॒गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य हे देखील होटगी मठात शिक्षण घेतले आहे. तर विद्यमान मठाध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य हे देखील याच मठात शिक्षण घेत आहेत.
-----------------------------------------------------------------------------
हिंदू धर्म भावैक्याचे मोठे कार्य
१९९० मध्ये मठाधिपती तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी अक्कलकोट रोड येथे श्री वीरतपस्वी मंदिराची उभारणी करून भक्तगणाला आपापल्या संप्रदायाचे देवदर्शन घडविण्याचे आणि हिंदू धर्म भावैक्य टिकविण्याचे मोठे कार्य केले. या मंदिराच्या ३३ एकराच्या परिसरात नवग्रह गणपती, साईबाबा, स्वामी समर्थ, श्रीकृष्ण, राधा, बालाजी, राम, लक्ष्मण, सीता, विठ्ठल-रुक्मिणी, महालक्ष्मी, संतोषी माता, महाकाली, दत्तात्रेय, सोमेश, दानम्मादेवी, वीरभद्रेश्वर, गोल्लळेश्वर, मन्मथस्वामी, सिद्धलिंग शिवाचार्य, वीरगंगाधर शिवाचार्य, चन्नबसव शिवाचार्य, साक्षी गणपती, अष्टभुजा देवी, नंदी असे तब्बल २८ मंदिर आहेत. त्यासह बारा ज्योतिर्लिंग, ध्यान मंदिर, १०८ फूट उंचीचे रेणुकाचार्य यांची मूर्ती, १००८ शिवलिंग स्थापना, असे हिंदू धर्म भावैक्याचे मोठे कार्य संस्थेने उभारले आहे.
--------------------------------------------------------------------------------------
तीन राज्यात ५१ शाखांतून चालते कार्य
वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य यांनी १९४३ साली मद्विरशैव गुरुकुल पाठशाळा आणि बाळीवेस मठात वसतिगृहाची सोय केली. त्यानंतर १९५६ मध्ये ते लिगैंक्य झाल्यानंतर तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी या संस्थेची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी १९५८ होटगी, १९५९ मध्ये बोरामणी येथे पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केली. त्यापाठोपाठ उच्च माध्यमिक, डी.एड, बी.एड, यशवंतराव मुक्त विद्यापीठावतीने बी.ए, बी.कॉम, तंत्रशिक्षण व व्होकेशनलची व्यवस्था, वैदिक शिक्षण, विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था होण्यासाठी ६ वसतिगृहांची सोय, १ सार्वजनिक वाचनालय असे एकूण तीन राज्यात ५१ शाखांतून शैक्षणिक कार्य चालते. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजनेतून आर्थिक मदत केली जाते.
--------------------------------------------------------------------------------------------
१५ हजार विद्यार्थी अन् ७०० शिक्षक
श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्रात मराठी व इंग्रजी माध्यमाचे पाच पूर्व प्राथमिक, पाच प्राथमिक, १४ माध्यमिक, पाच उच्च माध्यमिक, दोन तंत्रशाळा, १ अध्यापक विद्यालय, १ शिक्षणशास्त्र महाविद्यालय, १ संस्कृत पाठशाळा आणि ६ वसतीगृह आहेत. तसेच कर्नाटकात गुलबर्गा येथे कन्नड व इंग्रजी माध्यमाचे पाच शाळा तसेच दिल्ली येथील संगमविहार मठात संस्कृत पाठशाळा असे एकंदरीत या संस्थेत १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तर शिक्षक व शिक्षकतेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या ७०० इतकी आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
शिक्षणातून संस्कृती, समाजकार्य
शिक्षणातून संस्कृती जपणे आणि सामाजिक दायित्वाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली गेली पाहिजे. यासाठी वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये शाळेत सर्व सण, उत्सव साजरा करताना अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना परंपरा, संस्कृतीचा आत्मा समजावून सांगितले जाते. तसेच बौद्धिक व्याखानमाला, रक्तदान शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, गरजूंना अन्नदान अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दायित्वाची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला जातो.
---------------------------------------------------------------------------------------
प्रशासकीय सेवेत माजी विद्यार्थ्यांचा दबदबा
श्री बृहन्मठ शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेसह इतर क्षेत्रांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा दबदबा कायम आहे. उपजिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, शिक्षण विभाग, मुंबई मंत्रालय, सरकारी वकील, वर्तमानपत्र अशा विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर विद्यार्थी कार्यरत आहेत.
-----------------------------------------------------------------------------
सर्वात मोठे क्रीडांगण
शहरातील सर्व शिक्षणसंस्थेच्या तुलनेत सर्वात मोठे क्रीडांगण या शाळेला लाभले आहे. तब्बल पाच एकर जागेत क्रीडांगण आहे. नव्या शैक्षणिक धोरणांमध्ये नैसर्गिकरित्या विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी खेळांवर भर दिला आहे. परंतु एसव्हीसीएस प्रशाला पूर्वीपासून विद्यार्थ्यांच्या खेळ प्रकारांवर विशेष लक्ष देत असून मुलांच्या कलागुणांना वाव दिला जात आहे. हजारो विद्यार्थी आज राज्य व राष्ट्रस्तरावर विविध पदके मिळविली आहेत.
-------------------------------------------------------------------------------
शाळेतील राष्ट्रीय क्रीडापटू
एसव्हीसीएस शाळेत शिक्षण घेतलेले परंतु खेळामध्ये निपुण असलेले माजी विद्यार्थी श्री. गुरव हे मुंबईचे क्रीडाधिकारी आहेत. तसेच अनेक खेळाडूंना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही यावेळी श्री. स्वामी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.