‘BRS’ बिघडवणार सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे गणित; ‘या’ दोन मतदारसंघातही आव्हान

शहर उत्तर व शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पद्मशाली, तेलगू भाषकांची संख्या मोठी आहे. या मतदारसंघात मराठा व मुस्लिमही निर्णायक आहेत. दोन्ही मतदारसंघात ‘बीआरएस’ आपले बस्तान मजबूत करू लागला आहे. ‘बीआरएस’मुळे सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढल्याचे बोलले जात आहे.
BRS
BRSESAKAL

सोलापूर : शहर उत्तर व शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पद्मशाली, तेलगू भाषकांची संख्या मोठी आहे. या मतदारसंघात मराठा व मुस्लिमही निर्णायक आहेत. दोन्ही मतदारसंघात ‘बीआरएस’ आपले बस्तान मजबूत करू लागला आहे. पूर्व भागात माजी महापौर महेश कोठे यांचे वर्चस्व आहे. भाजपमधील चार-पाच माजी नगरसेवकांनी नुकताच ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला. पण, ‘बीआरएस’मुळे सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गींनी पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी पूर्वीची भाजप राहिली नसल्याची टीका केली होती. ज्या नेत्यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती. तेच आता सत्तेत सहभागी झाले असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत त्या भाजप नेत्यांची कोंडी होणार आहे.

एकीकडे ‘बीआरएस’ची सोलापुरात एन्ट्री अन् दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना व भाजप, या पक्षांच्या युतीत भाजपमधील अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळणार नसल्याची चिंता आहे. पुढे आणखी काहीजण पक्षांतर करतील, याची चिंता भाजप नेत्यांना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता विद्यमान आमदारांसह भाजपचे पदाधिकारी बूथ यंत्रणेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नऊ वर्षातील निर्णय, योजनांची माहिती घरोघरी पोचवत असल्याचे चित्र आहे.

‘बीआरएस’मुळे भाजपमध्ये फूट; अनेकांचे भाजपमधून पक्षांतर

सत्तेसाठी भाजपने पक्षाची मूळ विचारधारा पायदळी तुडवून विरोधकांना विशेषतः: ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशांना आपल्यासोबत घेतले आहे. त्यामुळे पक्षाची विश्वासार्हता जनतेतून संपली असल्याने आता आपण भाजपच्या तिकिटावर निवडून येणार नाही, असे अनेकांना वाटत आहे. त्यामुळे तेलगू समाजातील मतदारांच्या बळावर निवडून येतील, असे भाजप नेते ‘बीआरएस’मध्ये जात आहेत. ‘बीआरएस’मुळे भाजपमध्ये फूट पडून त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल.

- पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

‘बीआरएस’मुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला फरक पडणार नाही

सत्तेसाठी भाजप विरोधकांनाही सोबत घेत आहे. जुन्या लोकांना पक्षाची ही भूमिका पटलेली नाही. त्यामुळेच भाजपमधील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी ‘बीआरएस’सह काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये येत आहेत. राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठी सत्ता असूनही भाजपने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. २ ऑगस्ट रोजी आयटी पार्कच्या भूमिपूजनाचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिकेत निश्चितपणे महाविकास आघाडीचीच सत्ता येईल.

- महेश कोठे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, शरद पवार गट

‘बीआरएस‘चा सर्वाधिक फटका काँग्रेसलाच बसणार

पक्षाअंतर्गत मतभेदामुळे भाजपचे काहीजण ‘बीआरएस’सह इतर पक्षात गेले असतील. पण, जनता जागेवरच आहे. तेलंगणमध्ये ‘बीआरएस’ची ‘एमआयएम’सोबत युती आहे. आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित युती करून लढतील, अशी शक्यता आहे. त्याचा फटका सर्वत्र काँग्रेसला विशेषतः: ‘शहर मध्य’मध्ये बसणार आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवू. महापालिकेत आमचीच सत्ता येईल.

- अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

‘शहर मध्य’मध्ये काँग्रेसच्या कोंडीची शक्यता

आगामी निवडणुकीत ‘शहर मध्य’मध्ये ‘माकप’कडून नरसय्या आडम, ‘एमआयएम’चे फारुक शाब्दी, आता ‘बीआरएस’कडून स्वतंत्र उमेदवार असू शकतो. तसेच भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही उमेदवार असणार आहे. काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे निवडणूक लढतील. पण, माजी महापौर ॲड. यु. एन. बेरिया, माजी शहरप्रमुख सुधीर खरटमल यांच्यासह काहींनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मागील निवडणुकीत प्रणितींच्या विरोधात महेश कोठे निवडणूक लढले होते. त्यामुळे आता तेच नेते प्रणिती शिंदेंच्या विजयासाठी झटणार का हा प्रश्न आहे. एकूण ‘शहर मध्य’मधील उमेदवाराला विजयासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com