फडणवीसांनी दिलेलं उत्तर चुकीचंच, सरकार विरोधकांची गळचेपी करतंय; अंबादास दानवेंचा आरोप I Budget Session | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambadas Danve vs Devendra Fadnavis

विधानसभवनाबाहेरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

Budget Session : फडणवीसांनी दिलेलं उत्तर चुकीचंच, सरकार विरोधकांची गळचेपी करतंय; अंबादास दानवेंचा आरोप

Maharashtra Assembly Budget Session : महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालंय. राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात झाली.

दरम्यान कांदा, कापूस पिकांना दर मिळत नसल्यामुळं शेतकरी हवालदिल झाला असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा मुद्दा उचलून धरत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आज (मंगळवार) जोरदार आंदोलन केलं.

त्यानंतर विधानसभवनाबाहेरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. दानवे म्हणाले, राज्यात कांदा, कापसाला भाव मिळत नाही. आधी 13 ते 14 हजारांचा भाव होता. मात्र, आता 7 हजारापर्यंत हा भाव आला आहे. केंद्र सरकारनं ऑस्ट्रेलियातून कापसाच्या गाठी आयात केल्या. हा सगळा विषय घेऊन आज महाविकास आघाडीनं 289 च्या अंतर्गत चर्चेची मागणी केली.

ही मागणी करत असताना आम्ही आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, भूमिका न मांडताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं विरोधी पक्षांचा हा प्रस्ताव असतो, हक्क असतो. याच्यावर जनतेचे प्रश्न मांडवे लागतात. हे सगळं न मांडताच सरकारनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कांदा, कापूस, द्राक्षे, हरभरा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना दहा दिवस जेलमध्ये ठेवलं. या सगळ्या विषयांवर चर्चेची मागणी केली असता, पूर्ण चर्चा न होऊ देता आमचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. फडणवीसांनी उत्तर दिलेलं चुकीचं होतं. सरकार विरोधकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोपही अंबादास दानवेंनी केला.