गाढवांच्या पाठीवर पाण्याचे ओझे

सुनील सूर्यवंशी
रविवार, 19 मे 2019

मानवाने कितीही प्रगती केली असली तरीसुद्धा भौगोलिक अडचणीपुढे आजही तो हतबल ठरताना दिसतो. अशा स्थितीमध्ये त्याला प्राण्यांची मदत घेणे अपरिहार्य ठरते. 

तळोदा : मानवाने कितीही प्रगती केली असली तरीसुद्धा भौगोलिक अडचणीपुढे आजही तो हतबल ठरताना दिसतो. अशा स्थितीमध्ये त्याला प्राण्यांची मदत घेणे अपरिहार्य ठरते. 
तळोदा तालुक्‍यातील कुयरीडांबर, पालाबार या दुर्गम भागांतील तहानलेल्या गावांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अखेर गाढवांच्या पाठीवर पाण्याचे ड्रम नेत प्रशासनाने पाणीपुरवठा सुरू केला आहे. 

कुयरीडांबर, पालाबार, चिरमाळ या दुर्गम भागांतील गावांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. उपाययोजनांबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे संपर्क साधला असला तरी या भागात लहान टॅंकरही जायला रस्ते नसल्याने प्रशासनही हतबल झाले होते. त्यावर ग्रामस्थांनीच सुचविलेल्या पर्यायाचा विचार करीत गाढवांच्या पाठीवरून पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबाबत प्रशासनाने आधीच निर्णय घेतला होता, मात्र वेळेवर गाढव उपलब्ध होत नव्हते, ते आज मिळाले. 
स्वातंत्र्याची सत्तरी उलटल्यानंतरही या गावांना जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नसल्याने पायवाटेनेच जावे लागते.

पाण्याची पातळी खालावल्याने येथील विहिरी कोरड्या पडत आहेत. रस्ता नसल्याने तात्काळ उपाययोजना करणे अवघड झाले असून वनजमिनींचाही प्रश्न आहे, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार पंकज लोखंडे आणि सहकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. या दुर्गम भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पाड्यांमधील रहिवाशांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. त्या वेळी ग्रामस्थांनी शेवटचा पर्याय म्हणून गाढवांचा वापर करावा, असे सुचविले होते. त्यानुसार आज पायवाट तुडवित तहसीलदार लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवकांनी सात ते आठ किलोमीटर पायपीट करीत संबंधित गावांत धाव घेतली.

केवलापाणीपर्यंत सर्व अधिकारी वाहनाने पोचले. तेथून डोंगर चढून प्रवास केला. या वेळी अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. गावात पहिल्यांदा अधिकारी पाहून ग्रामस्थदेखील अवाक्‌ झाले होते. 

एकच पाझर

येथे ग्रामस्थांकडे गाढव असून केवलापाणी व पानबारी येथील विहिरीच्या माध्यमातून कुयलीडांबर येथे त्यांच्या साह्याने पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. दरम्यान, कुयलीडांबर येथे विहिरी असून केवळ एका विहिरीत झरा पाझरता आहे. त्यातून गावाची पाण्याची तहान भागविणे शक्‍य नसल्याने ग्रामपंचायतीमार्फत खोलीकरण व ब्लास्टिंगची कामे सुरू आहेत 

दुर्गम भागातील गावांमध्ये रस्त्यांअभावी टॅंकर जाऊ शकत नसल्याने जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशांन्वये गाढवांच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. चौगाव ग्रामपंचायतींतर्गत चेरीमाळ येथे नाल्यात विहीर खोदण्यात आली असून, जलवाहिनीच्या साहाय्याने जेंदाफडीमार्गे वरील गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

- सावित्री खर्डे, गटविकास अधिकारी, तळोदा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The burden of water on the back of donkeys