
काजू, मोहाचे मद्य ‘विदेशी ब्रॅण्ड’
मुंबई : काजूबोंडे, मोहाफुले आदींपासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी ‘देशी मद्य’ याऐवजी ‘विदेशी मद्य’ अशी करून या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे ‘स्थानिक मद्य’ निर्मितीच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. काजू बोंडे व मोहफुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणाऱ्या मद्याचे वर्गीकरण हे २००५ पासून ‘देशी मद्य’ असे करण्यात आले होते. या वर्गीकरणामुळे या मद्याच्या विपणनास व मुल्यवृद्धीस मर्यादा येत होत्या. त्यामुळे काजू बोंडे, मोहाफुले या पदार्थांसह स्थानिकपातळीवर उत्पादित होणाऱ्या फळे,फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून जे मद्य तयार केले जाईल त्यास ‘देशी मद्य’ याऐवजी ‘विदेशी मद्य’ असा दर्जा देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अशा मद्यार्कापासून निर्मित होणाऱ्या मद्यास ‘स्थानिक मद्य’ असे संबोधण्यात येईल. काजूबोंडे, मोहाफुले यासह स्थानिकरित्या उपलब्ध होणारे फळे-फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून पेय मद्याची निर्मिती होईल. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये वाया जाणाऱ्या व नाशवंत अशा उत्पादनांचा वापर होऊन, त्यांची मुल्यवृद्धी होईल. याचा फळे, फुले उत्पादकांना लाभ होणार आहे. याशिवाय, एक स्वतंत्र उद्योग निर्माण होऊन राज्यात रोजगार निर्मिती बरोबरच महसूलात वाढ अपेक्षित आहे.
याकरिता स्थानिक फळे, फुले इत्यादीपासून मद्यार्क उत्पादनाकरिता आसवनी परवाना देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. फळे, फुलांच्या उपलब्धतेनुसार कमी मद्यार्क उत्पादित झाल्यास अशा परिस्थितीत अथवा गरजेनुसार एखाद्या फळा, फुलांपासून उत्पादित मद्यार्काची दुसऱ्या फळा, फुलांपासून उत्पादित मद्यार्कामध्ये मिश्रण (ब्लेंडीग) करण्यास मुभा राहणार आहे. फळे,फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून उत्पादित होणाऱ्या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर सवलतीचा राहील.
शाळांसाठी पाच टक्के निधी
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आदर्श शाळांमध्ये विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, इंटरनेट/ वायफाय सुविधा निर्माण करणे या योजनांसाठी मंजूर नियतव्ययाच्या किमान ५ टक्के निधी कायमस्वरूपी राखून ठेवण्यास मान्यता देण्यात आली.
इतर निर्णय
पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता
शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल आता
१०० कोटी रुपये
गगनगिरी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे
३० वर्षांसाठी नुतनीकरण
सिलबंद विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीच्या परवान्यासाठी क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करण्यास मान्यता
Web Title: Cabinet Approval For Making Wine From Fruits And Flowers Employment And Revenue Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..