नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार शक्य! जिल्ह्यातील ‘या’ तीन आमदारांची नावे आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mantralay
नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार शक्य! जिल्ह्यातील ‘या’ तीन आमदारांची नावे आघाडीवर

नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार शक्य! जिल्ह्यातील ‘या’ तीन आमदारांची नावे आघाडीवर

सोलापूर : महाविकास आघाडीला चेकमेट देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताबदलाचा करिष्मा करून दाखविला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. आता हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात भाजपचा एवढे आमदार व खासदार कधीच विजयी झाले नव्हते. माढा (रणजितसिंह नाईक निंबाळकर) व सोलापूर (डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी) लोकसभा मतदारसंघाचे दोन्ही खासदार भाजपचेच विजयी झाले. तर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, माळशिरस, पंढरपूर-मंगळवेढा हे पाच आमदार भाजपचे तर बार्शीचे आमदार भाजपच्या मदतीने झाले. आता भाजपचा डोळा प्रामुख्याने शहर मध्य, माढा, करमाळा व मोहोळ या चार मतदारसंघावर आहे. उमेदवारी वाटपात काही मतदारसंघ शिंदे गटाकडे जातील. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघात भाजपचाच आमदार विजयी व्हावेत, यासाठी कोणता आमदार स्ट्राँग ठरेल त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल, असेही बोलले जात आहे. दरम्यान, माढा लोकसभा आणि करमाळा, माळशिरस या विधानसभा मतदारसंघात मोहिते-पाटलांचे प्राबल्य अधिक आहे. त्यामुळे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना संधी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता यावी आणि ‘शहर मध्य’मधील काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ मिळविण्यासाठी विशेषत: विजयकुमार देशमुख यांना संधी मिळू शकते. दुसरीकडे सुभाष देशमुख यांचीही ताकद जिल्ह्यात मोठी आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेटची संधी मिळू शकते, असेही बोलले जात आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना संधी मिळेल, अशी सर्वांनाच आशा होती. पण, जिल्ह्यातील कोणालाच संधी मिळाली नसल्याने आता विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘गॉड फादर’कडे फिल्डिंग

शिवसेना-भाजपच्या युती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे मदत व पुनर्वसन आणि सहकार खात्याची जबाबदारी दिली होती. तर आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर पालकमंत्री आणि राज्यमंत्री म्हणून आठपेक्षा अधिक खाती दिली होती. त्यांच्या कामगिरीमुळे भाजपचा विस्तार वाढला, संघटना मजबूत झाले. महापालिकेवर सत्ता आणि दोन खासदार, सहा आमदार भाजपचे निवडून आले. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भरघोस यश मिळवून पुढच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार व दोन्ही खासदार पुन्हा विजयी होण्यासाठी जिल्ह्याला विस्तारात एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री मिळेल, अशी अपेक्षा आहे. इच्छुकांनी त्यांच्या त्यांच्या गॉड फादरच्या माध्यमातून फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.