'सर्व्हर जाम' झाल्याने ग्रामपंचायत इच्छुकांची जात पडताळणी ऑफलाईन 

प्रकाश सनपूरकर
Tuesday, 29 December 2020

राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीची तयारी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये आरक्षित जागांवर लढणाऱ्या इच्छुकांना त्यांची जात वैधता करून घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शासनाने ऑनलाइन पद्धतीने जातपडताळणी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते

 

सोलापूरः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांनी जात पडताळणी अर्ज ऑनलाईन भरत असताना एकाच वेळी राज्यात पन्नास हजार अर्ज अपलोड करण्यामुळे हा सर्व्हर मागील चोविस तासापासून जाम झाला आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया ऑफलाईन करण्याच्या बाबत निर्णय घेतला जात आहे. 
राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीची तयारी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये आरक्षित जागांवर लढणाऱ्या इच्छुकांना त्यांची जात वैधता करून घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शासनाने ऑनलाइन पद्धतीने जातपडताळणी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. 
एकाच वेळी राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याची घाई सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याच्यासोबत जात पडताळणी साठी केलेल्या अर्जाची पोचपावती जोडावी लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरात एकाच वेळी ही प्रक्रिया सुरू आहे. 
मागील 24 तासात एकाच वेळी 50 हजार इच्छुकांनी ऑनलाईन जात पडताळणी उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात केल्याने सर्वर जाम झाला आहे. त्यामुळे कोणत्या ईच्छुकांला जात पडताळणी अर्ज अपलोड करणे अशक्‍य झाले. आज सकाळपासून येथील जात पडताळणी कार्यालयात शेकडो इच्छुकांनी स्वतः हजर राहून या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा जात पडताळणी कार्यालयाने या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे. 
अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया विस्कळित होऊ नये म्हणून अत्यंत काळजीपूर्वक ऑफलाइन पद्धतीने इच्छुकांना त्यांचे अर्ज दाखल दाखल करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तातडीने ऑफलाईन अर्ज जमा करून घेत त्याची पोहोच पावती संबंधितांना देण्यात यावी यासाठी प्रशासन पातळीवर लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

आदेश फक्त निवडणूकीपुरते 
ग्राम पंचायत निवडणुकीसाठी होणारी जात पडताळणी प्रक्रिया ऑफलाईन करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांना त्यांचे अर्ज जात पडताळणी कार्यालयात सादर करता येणार आहेत. 
ृ- छाया गाडेकर, उपायूक्त, जात पडताळणी कार्यालय सोलापूर.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caste verification of Gram Panchayat aspirants offline due to 'server jam'