महागाईवर नियंत्रणाची जबाबदारी केंद्राची - शरद पवार

शरद पवार : सर्वांनी एकत्र येण्याची गरज; सरकारकडे भूमिका मांडणार
Center government responsible for controlling inflation  Sharad Pawar
Center government responsible for controlling inflation Sharad Pawaresakal

नांदेड : ‘‘देशातील किरकोळ महागाई दराने आठ वर्षांतील उच्चांक गाठला. महागाई आवाक्याबाहेर जात आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. याबाबत डाव्या आघाडीतर्फे चर्चेसाठी माझ्याकडे विचारणा झाली. महागाईबाबत सर्वांना एकत्र घेऊन केंद्र सरकारकडे भूमिका मांडली जाणार आहे,’’ अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

पवार म्हणाले, ‘‘इंधन, गॅस सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने महागाई वाढली. ती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची आहे. त्यामुळे याबाबत सीताराम येचुरी तसेच इतरांकडूनही विचारणा झाली. महागाईबाबत सर्वांनी एकत्र येत केंद्राकडे भूमिका मांडू.’’

महाराष्ट्रात असे कधी घडले नाही

पवार म्हणाले, ‘‘केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि राज्यातील पक्षाची भूमिका आम्हाला योग्य वाटत नाही. मतभेद असतात. पण, एकमेकांसंबंधीची टोकाची भूमिका, भावना ठेवणे योग्य नाही. एका चौकटीच्या बाहेर व्यक्तिगत स्वरूप येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यापूर्वी महाराष्ट्रात कधी असे घडले नाही. नवाब मलिक प्रवक्ते होते. २५ वर्षांपूर्वीचे प्रकरण काढणे, माजी गृहमंत्री देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार केलेल्या अधिकाऱ्याला राज्याबाहेर आधार घ्यावा लागतो, याचा अर्थ काय काढायचा?’’

नवीन प्रश्न निर्माण करू नये

एमआयएमच्या नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहण्याच्या प्रकाराबाबत विचारले असता पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे आणि औरंगजेबाने काय केले हेही माहिती आहे. त्यामुळे कारण नसताना दुसऱ्या राज्यातून येऊन शांततेत असलेल्या महाराष्ट्रात नवीन प्रश्न निर्माण करणे योग्य नाही’’, असे मत व्यक्त केले.

यंदा अतिरिक्त ऊस झाला आहे. ऊस संपल्याशिवाय कारखाने बंद करू नका, असेही राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत. हा प्रश्न सुटेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर आघाडीचा निर्णय

‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाआघाडी एकत्र लढविण्याबद्दल पवार म्हणाले, ‘‘ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ओबीसी जागेच्या निकालाबाबत न्यायालयाचा निर्णय आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या एकत्र लढायच्या की स्वतंत्र लढवून पुन्हा एकत्र यायचे का? आदींबाबत त्या-त्या पक्षाचे अध्यक्ष व प्रमुख एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतील.’’

सरकार पाच वर्षे टिकेल

आघाडी सरकारवर आणि माझ्यावर आरोप करण्यात येत असले तरी सरकारला काहीही अडचण नाही. मी समाधानी असून, आघाडी सरकार पाच वर्षे चालायला काहीच हरकत नाही. नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील हे सातत्याने सरकारला तारखा देत असतात. पण, त्यात काही तथ्य नाही. त्यांची विधाने आता ‘एन्जॉय’ केली जातात, असेही शरद पवार म्हणाले.

संभाजीराजे छत्रपतींबाबत सकारात्मक

‘राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे अपक्ष म्हणून लढणार आहेत. त्यावर महाविकास आघाडीची भूमिका काय असणार?’ या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ लक्षात घेता आमचा एक प्रतिनिधी निवडून येतो. शिल्लक १२ मते आहेत. शिवसेनेचाही एक निवडून येतो. त्यांचीही शिल्लक मते आहेत. कॉँग्रेसही मदत करेल. काही अडचण येणार नाही. आम्ही संभाजीराजे छत्रपतींबाबत सकारात्मक आहोत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com