जिल्हा बँक निवडणूकीचे पुन्हा बिगुल वाजले ; राजकीय संदर्भ बदलण्याची शक्यता : Central Bank Election 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank Election 2021

राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने बँकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग होणार आहे.

जिल्हा बँक निवडणूकीचे पुन्हा बिगुल वाजले ; उच्च न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ( Central Bank Election 2021) ज्या टप्प्यावर थांबली आहे तेथून पुढे ती सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश आज उच्च न्यायालयाने यासंदर्भात दाखल झालेल्या स्वतंत्र याचिकेवरील निर्णय देताना दिला. विधान परिषदेची (Vidhan Parishad Election)निवडणूक सुरू असतानाच जिल्हा बँकेची प्रक्रिया सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालकांची मुदत मे २०२० मध्येच संपली आहे. पण राज्यातील कोरोनाचा कहर पाहता या निवडणुकांना वेळोवेळी स्थगिती देण्यात आली होती. ऑगष्टमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती राज्य सरकारने उठवली. त्यानंतर बँकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. २७ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली. त्याच दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी विभागीय सहनिबंधक अरूण काकडे यांची नियुक्तीही झाली. निवडणुकीचा कार्यक्रमही प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला. पण त्याच दरम्यान काही संस्थांनी मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होऊन त्यावरील निर्णय प्रलंबित होता. तत्पुर्वीच मडिलगे (ता. आजरा) येथील शंकरसिंग विकास सोसायटीच्यावतीने ही निवडणूक तातडीने घेण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर आज न्यायमुर्ती जामदार व न्यायमुर्ती पटेल यांच्या खंडपीठासमोर झाली. या खंडपीठाने जिल्हा बँकेची निवडणूक ज्या टप्प्यावर थांबली आहे, तेथून ती पुढे सुरू करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: शिवसेना आमदाराच्या कार्यालयावर नगरपालिकेचा बुलडोझर

सद्या जिल्ह्यात विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. याच दरम्यान जिल्हा बँकेची प्रक्रिया सुरू होत असल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. बँकेवर राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने बँकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग होणार आहे. तथापि शिरोळ, करवीर, राधानगरीसह अन्य चार तालुक्यातील विकास सोसायटी गटातच काहींनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. ‘जनसुराज्य’ चे आमदार विनय कोरे यांनी विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना विरोध करतानाच विकास सोसायटी गटातील दोन जागा सोडून अन्य एका जागेची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशाराही त्यांनी यापुर्वीच दिला आहे. या पार्श्‍वभुमीवर या निवडणुकीतील राजकीय संदर्भही बदलण्याची शक्यता आहे.

loading image
go to top