नव्या ध्वज संहितेला गांधीवाद्यांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Government Decision Code of National Flag Nylon along with khadi polyester flag allowed
नव्या ध्वज संहितेला गांधीवाद्यांचा विरोध

नव्या ध्वज संहितेला गांधीवाद्यांचा विरोध

वर्धा : राष्ट्रध्वजाची एक संहिता आहे. या संहितेनुसार ठराविक कापड, मापातच ध्वज आतापर्यंत तयार होत आला आहे. मात्र, आता केंद्राने ध्वज संहितेत बदल केला आहे. यामुळे आता खादीचाच नाही तर नायलॉन, पॉलिस्टर, लोकर, सिल्क खादीसह कोणत्याही मशिनमध्ये तयार करण्यात आलेल्या कापडाच्या राष्ट्रध्वजाला मान्यता मिळाली आहे. या नव्या संहितेला गांधी विचारकांकडून विरोध करण्यात येणार असल्याची माहिती सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष आर. टी. एन. प्रभू यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

केंद्र शासनाने केलेल्या या बदलात केवळ देशातच बनलेला राष्ट्रध्वजच वापरणे बंधनकारक नसून तो बाहेर देशातून आयात करण्याची मुभाही दिली आहे. यामुळे कधीकाळी राष्ट्रध्वजाचा असलेला मानसन्मान लयाला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रध्वजाच्या या बदललेल्या संहितेची केंद्र सरकारच्यावतीने कुठेही वाच्यता करण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. स्वातंत्र्य दिन असो वा गणतंत्र दिन शासकीय कार्यक्रमात आतापर्यंत केवळ खादीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात येत होता. त्याची निर्मिती मोजक्याच जिल्ह्यात होत होती. त्यात वर्ध्याच्या सर्वसेवा संघाच्या खादी ग्रामोद्योगचा समावेश आहे. येथून देशात आणि देशाबाहेरही राष्ट्रध्वज पाठविण्यात येत होता. आता त्याच्या आचारसंहितेत बदल झाल्याने खादीचा नियमित राष्ट्रध्वज कालबाह्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गांधी विचारांची हत्या

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी त्यांनी जर राष्ट्रध्वज खादीचा नसेल तर आपण सलामी देणार नाही अशी भूमिका घेतली होती, अशी माहिती सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष आर. टी. एन. प्रभू यांनी दिली. त्या काळापासून देशात सर्वत्र खादीच्या राष्ट्रध्वजाचा वापर होत होता. त्याची तशी संहिता निर्माण करण्यात आली होती. आता त्यात बदल करून महात्मा गांधींच्या विचारांची पुन्हा हत्या करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

खादीचा राष्ट्रध्वज देशाची शान आहे. या राष्ट्रध्वजाचा एक मान आहे. तो बनविण्याची संहिता आहे. मात्र, केंद्र शासनाने त्यात बदल करून राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याची एक प्रकारे मुभाच दिली आहे. केंद्राकडून नव्याने निर्माण केलेल्या या आचारसंहितेचा विरोध होणे गरजेचे आहे.

- आर. टी. एन. प्रभू अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान सेवाग्राम जि. वर्धा

Web Title: Central Government Decision Code Of National Flag Nylon Along With Khadi Polyester Flag Allowed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top