केंद्राचे शेतकरीविरोधी पाऊल - डॉ. अजित नवले

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणून शेतीमालाला हमीभावाचे संरक्षण मिळावे यासाठी सुधारणा करण्यावर भर देण्याऐवजी बाजार समित्याच बरखास्त करणे म्हणजे आजारापेक्षा इलाज जहाल असल्याचा हा प्रकार आहे. 
- डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, भारतीय किसान सभा

मुंबई - बाजार समित्या बरखास्त करण्यावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बाजार समित्या बरखास्त करणे हा शेतकऱ्यांच्या गळ्यात फास घालून आवळण्याचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शेतीमालाला किमान आधारभावाचे संरक्षण काढून टाकण्याच्या दिशेने टाकलेले हे गंभीर शेतकरीविरोधी पाऊल असल्याचा आरोप भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे. 

शेतकरी कर्जमाफी, कमी हमीभाव, पिकांची नासाडी अशा संकटांनी शेतकरी ग्रस्त असताना बाजार समित्या बरखास्त करून त्यांची असणारी हक्‍काची बाजारपेठ संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत मुंडे यांनी व्यक्‍त केले आहे. बाजार समित्यांच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांना शेतीमालासाठी वाजवी दर देण्यात येत नसल्याने बाजार समित्या बरखास्त करण्याचा विचार असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्‍त केले होते. बाजार समित्या बरखास्त करून ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार अधिक प्रभावीपणे राबविला जाईल, असे वक्‍तव्य सीतारामन यांनी अलीकडेच व्यक्‍त केले होते. नवले म्हणाले, ‘‘नफेखोर कॉर्पोरेट कंपन्यांना शेतकऱ्यांच्या शेतीमालाची आणखी खुली लूट करता यावी यासाठीच बाजार समित्या बरखास्त करण्याचे कारस्थान केले जात आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central government farmer dr ajit navale