esakal | बळीराजा सुखावणार! राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon

गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे राज्यात चिंतेचे ढग दाटले होते. मात्र, आता पावसाचे पुनर्गामन होत आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

बळीराजा सुखावणार! राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे- गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे राज्यात चिंतेचे ढग दाटले होते. मात्र, आता पावसाचे पुनर्गामन होत आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने रविवारी (ता. ११) वर्तविली आहे. (Chance of return of rains in the state pune Meteorological Department)

रविवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण गोवा येथील तुरळक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला होता. मॉन्सून सक्रिय असून सध्या बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात मॉन्सून पूर्ण देशाला व्यापेल. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या १५ जुलै पर्यंत कोकण गोव्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हळू हळू वाढेल. तर मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी पडतील.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

शहरात आठवडाभर मध्यम स्वरुपाचा पाऊस, घाट भागात जोरदार सरी

शहर आणि परिसरातही रविवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. शहरात ०.२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. शहरात सध्या ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच १४ ते १५ जूलै दरम्यान शहरातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर घाट भागांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडतील. त्यामुळे कमाल तापमानातही काहीशी घट होण्याची शक्यता आहे.

शहरात झालेला हंगामातील एकूण पाऊस (१ जून पासून आतापर्यंत)

ठिकाण ः पाऊस (मिलिमीटरमध्ये)

पुणे शहर ः १६७.१

पाषाण ः २२५.१

लोहगाव ः २१९.९

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीसह वायव्य भारतातील मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबले आहे. १० जुलै रोजी मॉन्सून दिल्लीत दाखल होण्याची शक्यता होती. मात्र अद्यापही मॉन्सूनची प्रगती झालेली नसून, अजूनही तो मंदावलेलाच आहे. आज (ता. १२) दिल्लीसह वायव्य भारतात प्रगती करण्याची शक्यता आहे. दरम्यान

बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वायव्य भारताकडे येऊ लागल्याने मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान तयार झाले आहे. हे वारे दिल्ली, हरियाना, पूर्व राजस्थानपर्यंत पोचले आहेत. या भागात आर्द्रता देखील वाढली आहे.

येथे होणार जोरदार पाऊस :

सोमवार ः पूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, वाशीम

मंगळवार ः संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर

बुधवार ः संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, नांदेड, परभणी, यवतमाळ, जालना, हिंगोली, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ

गुरुवार ः संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना

loading image