विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीची शक्यता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडासह विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडासह हलका पाऊस आणि सोसाट्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात उद्यापासून पावसाच्या हलक्या सरी व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याच बरोबर पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडासह विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडासह हलका पाऊस आणि सोसाट्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दक्षिण मध्य महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. त्याचबरोबर दक्षिण तामिळनाडूच्या दिशेने उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाऱ्यांचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून यामध्ये काही प्रमाणात आर्द्रता आहे. येत्या शुक्रवारपर्यंत चक्राकार वारे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील वाऱ्यांचे कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रात प्रवेश करत असताना सोबत मोठ्या प्रमाणात आद्रता आणतील. परिणामी बुधवारी (ता. २५) पुणे जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस आणि मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याच बरोबर नगर, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूरच्या काही भागात गारांच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पकिस्तानच्या दिशेनी पाश्चात्य विक्षोभही (वेस्टर्न डिस्टर्बन्स) राज्यात प्रवेश करणार असून ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस अशीच राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

"चक्राकार वारे आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण करणाऱ्या वाऱ्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने हा गारांचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर पाकिस्तानचा दिशेनी पुढील तीन दिवस म्हणजेच शनिवारपर्यंत ही स्थिती अशीच राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा , कोकण आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे." 
- अनुपम काश्यपी, हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of Rain in vidarbha and marathwada