esakal | राष्ट्रवादी-भाजप युतीची चर्चा; चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याची बातमी आली आणि राज्यात वेगळी समीकरणे तयार होत असल्याची चर्चा रंगली. याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी-भाजप युतीची चर्चा; चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चा रंगल्या आहेत. राज्याच्या पोलिस दलात झालेल्या मोठ्या घडामोडीनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले आरोप. त्यावरून भाजपकडून सातत्यानं केली जाणारी राजीनाम्याची मागणी आणि एकूणच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला विरोधकांकडून धारेवर धरलं जात आहे. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्य करतात असं म्हटल्यानं सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याची बातमी आली आणि राज्यात वेगळी समीकरणे तयार होत असल्याची चर्चा रंगली. याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा आणि शरद पवार यांची भेट ही नेहमीसारखीच आहे. त्यात वेगळं असं काही नाही. अशा भेटी होतच असतात. खरंतर भेटीचं राजकारण व्हायला नको. राजकारण हे राजकारणाच्या जागी असायला हवं असं त्यांनी म्हटलं. 

महाराष्ट्रातील सध्याचं वातावरण, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर करत असलेले आरोप प्रत्यारोप यावरही चंद्रकांत पाटील य़ांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, राजकारणाशिवायही भेट घेतली पाहिजे. महाराष्ट्रात अलिकडे, विशेषत: गेल्या दीड वर्षात अशा भेटींचे प्रमाण कमी झाले आहे. शरद पवार आणि अमित शहा यांची भेट राजकीय असेलच असं नाही असेही पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकाही केली. ते म्हणाले की, एका बाजुला अमित शहा यांनी भेट झाल्याचं म्हटलं आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मात्र अशी भेट झालीच नाही हे सांगण्याची स्पर्धा लागली असल्याचं त्यांनी म्हटलं. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अमित शहा  आणि शरद पवार भेटीनंतर राज्यात पुन्हा वेगळी राजकीय समीकऱणं दिसणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप एकत्र येण्याचा निर्णय़ घेतला तर तुमची काय भूमिका असेल असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला सध्यातरी या भेटीबाबत काही माहिती नाही. आमच्या पक्षश्रेष्ठींनी जर राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका घेतली तर ती मान्य असेल. अमित शहा, जेपी नड्डा जे निर्णय घेतील त्याचं आम्ही पालन करू असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यांन सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

हे वाचा - 'आता तरी रहस्य कथेचा शेवट करा', शाह-पवार भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांचे सूचक टि्वट

'गरीबांचं दु:ख मातोश्रीवर बसून कळणार नाही'
राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. तसंच या सरकारने आता लॉकडाऊन केलं तर एक रुपयासुद्धा पॅकेज देणार नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात लोक कसं जगले हे तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी तुम्ही झोपडपट्टीत जा, तिथं लोकांना दिवसभर काम केल्याशिवाय रात्री चूल पेटत नाही. गरिबांचं दु:ख मातोश्रीवर बसून कळणार नाही असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 
 

loading image