

तात्या लांडगे
सोलापूर : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील शुल्क रचनेत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने मोठा बदल केला आहे. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्याला जागा मिळूनही तो पुढील फेरीत सहभागी होत असल्यास त्याला प्रत्येकवेळी विनापरतावा अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
नव्या नियमानुसार, विद्यार्थ्याला कोणत्याही प्रवेश फेरीत प्रथमच महाविद्यालयाची जागा मंजूर झाल्यास एक हजार रुपये शुल्क भरावे लागेल. त्यानंतर पुन्हा नव्याने जागा मंजूर होऊन ती स्वीकारल्यास दोन हजार रुपये, तर तिसऱ्यांदा नवीन जागा मिळाल्यास तीन हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यापूर्वी प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळाल्यानंतर विद्यार्थी पुढील फेरीत सहभागी होऊ शकत होते. मात्र, आता प्रत्येक नव्या अलॉटमेंटनंतर शुल्क आकारले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत अधिक सजगपणे निर्णय घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच फेरीत पसंतीचे महाविद्यालय मिळूनही विद्यार्थी पुढील फेरीत सहभागी झाल्यास त्याला अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
नवीन शुल्क रचना अशी...
कोणत्याही प्रवेश फेरीत (पहिली ते चौथी) प्रथमच जागा मंजूर झाल्यास : १,००० रुपये
दुसऱ्यांदा नवीन जागा मंजूर होऊन ती स्वीकारल्यास : २,००० रुपये
तिसऱ्यांदा नवीन जागा मंजूर होऊन ती स्वीकारल्यास : ३,००० रुपये
प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक असे...
पहिली फेरी
२८ ते ३० जुलै : ऑप्शन फॉर्म भरणे
२ ऑगस्ट : महाविद्यालय वाटपाची यादी जाहीर
३ ते ५ ऑगस्ट : प्रवेश निश्चित करणे
-------------------------------------------------------------------------------------
दुसरी फेरी
७ ते ९ ऑगस्ट : ऑप्शन फॉर्म भरणे
१२ ऑगस्ट : महाविद्यालय वाटपाची यादी जाहीर
१३ ते १७ ऑगस्ट : प्रवेश निश्चित करणे
-------------------------------------------------------------------------------------
तिसरी फेरी
१९ ते २१ ऑगस्ट : ऑप्शन फॉर्म भरणे
२४ ऑगस्ट : महाविद्यालय वाटपाची यादी जाहीर
२५ ते २७ ऑगस्ट : प्रवेश निश्चित करणे
--------------------------------------------------------------------------------------
चौथी फेरी
२९ ते ३१ ऑगस्ट : ऑप्शन फॉर्म भरणे
३ सप्टेंबर : महाविद्यालय वाटपाची यादी जाहीर
४ ते ७ सप्टेंबर : प्रवेश निश्चित करणे
विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेवेळी खबरदारी घ्यावी
अभियांत्रिकी प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. २२ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. २५ जुलैपर्यंत त्यावर हरकती व तक्रारी नोंदविता येतील. त्यानंतर २८ जुलैपासून पहिल्या प्रवेश फेरीला सुरुवात होणार आहे. ‘सीईटी’ कक्षाने प्रवेश फेरीतील शुल्कात बदल केल्याने विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या पसंतीच्या महाविद्यालयात त्याच फेरीत प्रवेश निश्चित करावा.
- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.