मग, पवारांचे नाव जाहीरच का केले; भुजबळांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. याप्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना, ‘पवारांचे नाव जाहीर केलेच का?’ असा प्रश्न छगन भुजबळ यांनी आज उपस्थित केला. 

मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना, ‘पवारांचे नाव जाहीर केलेच का?’ असा प्रश्न छगन भुजबळ यांनी आज उपस्थित केला. 

सरकार हमसे डरती है| ईडी काे आगे करती है|

काय म्हणाले छगन भुजबळ?
शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. नेत्यांनीही पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर हजेरी लावली आहे. पवार आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये सकाळी एक बैठक झाली. त्यानंतर पवारांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहनही केले. पण, पक्षाचे कार्यकर्ते हे, पवार यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत येत आहेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे. 

शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी राहूल गांधी मैदानात

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याविषयी इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘निवडणुकीच्या तोंडावर, शरद पवार ‘ईडी’मध्ये अडकले, असे वातावरण करून त्याचा निवडणुकीत फायदा उठवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. या सगळ्या प्रकरणाचा जर, अभ्यास केला जाणार होता. तर, शरद पवार यांचे नाव गोपनीय ठेवायला हवे होते. ते जाहीर का केले? पोलिस खात्याने अशा अनेक गोष्टी गोपनिय ठेवायच्या असतात. शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी सर्वस्व आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून नेते मुंबईत येत आहेत. पोलिस धरपकड करणार हे गृहीत धरून कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. त्यांना पोलिस कारवाईची भिती नाही.’ 

काय घडतंय मुंबईत?

  1. ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
  2. ईडी कार्यालय परिसरात कलम १४४लागू; जमावबंदी आदेश लागू
  3. पोलिसांकडून ड्रोनच्या साह्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर ठेवली जातेय नजर ठाण्यातून आणि नवी मुंबईतून येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले : राष्ट्रवादी काँग्रेस 
  4. पोलिसांकडून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हालचालींवर ठेवली जातेय नजर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan bhujbal critisize government on sharad pawar isshue