संभाजी राजे माघारी फिरावे म्हणून पोर्तूगिजांनी सेंट झेविअरपुढे वाहिला होता राजदंड! Chhatrapati Sambhaji Maharaj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati sambhaji maharaj

Chhatrapati Sambhaji Maharaj : संभाजी राजे माघारी फिरावे म्हणून पोर्तूगीजांनी सेंट झेविअरपुढे वाहिला होता राजदंड!

स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराजांपासून बचाव व्हावा, यासाठी गोव्यात असलेल्या पोर्तूगीजांनी वेगळाच पराक्रम केला होता. महाराजांचा वार सहन करावा लागू नये म्हणून पोर्तूगिज अधिकारी व्हॉईसरॉय यांनी चक्क ख्रिश्चन संत सेंट झेवियर यांचा धावा केला होता. आज छत्रपती शंभूराजांचा स्मृतिदीन. त्याच निमित्ताने काय होता तो प्रसंग पाहुयात.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूची बातमी समजताच मुघल सम्राट औरंगजेब मराठा साम्राज्य नेस्तनाबूत करायला लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. इंग्रज, पोर्तुगीज आणि मुघल मराठा साम्राज्यावर एकाच वेळी चालून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली. औरंगजेब लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्रात आला खरा पण एवढ्या फौजेला खायला घालायचे काय असा प्रश्न पडू लागला.

तेव्हा औरंगजेबाने पोर्तुगीजांना पत्र लिहून मदतीची आर्त हाक मारली. पोर्तुगीज औरंगजेबाला मदत करण्यास राजी झाला. यावरून चिडलेल्या संभाजी राजेंनी पोर्तुगीजांना तटस्थ राहण्यास सांगितले. गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले.

पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. त्यामुळेच या गव्हर्नरला गोव्याच्या बाहेर काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा बेत संभाजी राजे अखात होते. गोव्याजवळील फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी राजांनी ठरवले कि गोव्याच्या पोर्तुगीजांना याच किल्ल्यावर येणे भाग पाडायचे.त्यासाठी फोड्यावर खजाना असल्याची अफवा उठवली.

फोडा किल्ला, गोवा

फोडा किल्ला, गोवा

अफवा ऐकून पोर्तूगीज भुलले आणि त्यांनी फोंड्यावर हल्ला केला. ७ नोव्हेंबर १६८३ रोजी पोर्तुगीज व्हीसेरेई (व्हॉईसरॉय) फ्रान्सिको दि ताव्होरा याने मराठ्यांच्या ताब्यातील फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. हे समजताच संभाजी महाराज ३००० सैन्यासह राजापूरहून गोव्याला निघाले. ही बातमी कळताच व्हीसेरेईने माघार घेतली. मराठ्यांनी पळून जाणाऱ्या पोर्तुगीज सैन्यावर जोरदार हल्ले केले. अखेर १२ नोव्हेंबरला व्हीसेरेई आपल्या उरल्या सुरल्या सैन्यासह गोव्यात परतला.

फोंडा किल्ल्यावरील छत्रपती शंभूजारांचा पुतळा

फोंडा किल्ल्यावरील छत्रपती शंभूजारांचा पुतळा

व्हाइसरॉयचा संभाजी महाराजांनी सपाटून पराभव केला. आणि त्याला गोव्याकडे पळवून लावले. गोव्यापर्यंत त्याचा पाठलाग करून महाराजांनी पोर्तुगीजांचे जुवे बेट काबीज केले. आता पुन्हा व्हाइसरॉय जुवे बेटावर चालून आला. तेव्हा त्याला पुन्हा इतका जबरदस्त मार दिला की, त्याला पळता भुई थोडी झाली. कसाबसा तो आपल्या राजधानीत पोहोचला.

ओल्ड गोवा चर्च

ओल्ड गोवा चर्च

संभाजी महाराजांची आता प्रत्यक्ष गोव्यावर स्वारी होणार, हे स्पष्ट दिसू लागताच व्हाइसरॉयने सेंट झेवियरची शवपेटी उघडली. त्यातून सेंट झेवियर यांचे शव बाहेर काढून त्यांच्या पायाशी आपला राजदंड ठेवला. गोव्याचे रक्षण करावे म्हणून डोळ्यांत अश्रू आणून त्याने झेवियरची प्रार्थना केली.त्यानंतर ही प्रथाच पडली.

संभाजीराजे गोव्यावर चालून जाण्याच्या तयारीत होते तोच इकडे औरंगजेब स्वराज्याकडे कुच करत होता. ही बातमी समजताच स्वराज्याला वाचवण्यासाठी संभाजीराजे मागे फिरले.

सेंट झेविअर्स यांची शवपेटी

सेंट झेविअर्स यांची शवपेटी