दंगल घडत होती, तेव्हा पोलीस कुठे होते? इम्तियाज जलील यांचा पोलिसांवर गंभीर आरोप I Imtiaz Jaleel | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imtiaz Jaleel

ही दंगल थांबवण्यात पोलीस कमी पडली आहेत, असं माझं ठाम मत आहे. मी प्रश्न विचारु इच्छितो, दंगल घडत होती, तेव्हा त्या रात्री पोलीस कुठे होते.

Imtiaz Jaleel : दंगल घडत होती, तेव्हा पोलीस कुठे होते? इम्तियाज जलील यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar Violence) किराडपुरा भागात बुधवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता. रामनवमीच्या (Ram Navami) पार्श्वभूमीवर, राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या घोळक्यानं उत्सवासाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली.

पाहता-पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल केला. शहरातील जिन्सी पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयरनुसार, किराडपुरा भागात रात्री झालेल्या राड्यात एकूण 15 गाड्यांचं नुकसान करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांवर आरोप केलाय.

माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, ही दंगल थांबवण्यात पोलीस कमी पडली आहेत, असं माझं ठाम मत आहे. मी प्रश्न विचारु इच्छितो, दंगल घडत होती, तेव्हा त्या रात्री पोलीस कुठे होते. 13 गाड्या जाळल्या जात होत्या, तेव्हा पोलीस कुठे होते. फक्त 15 पोलिसवाले ही दंगल थांबवणार होते का? असा सवाल त्यांनी केलाय.

शहरात शंभर कोटींपेक्षा जास्त पैसे खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्या सीसीटीव्ही फूटेजमधील दंगल महाराष्ट्राला, देशाला दाखवा. मी कोणाकडं बोट दाखवत नाहीये आणि कोणावर आरोपही करत नाही. पण, पोलिसांनी आणि सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी मागणी करावी की, हायकोर्टाच्या माध्यमातून याची चौकशी करावी. माझा या सरकावर विश्वास राहिला नाही. दंगल थांबवण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली होती, पण ती तुम्ही थांबवू शकला नाही, असा घणाघातही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.