विरोधकांचे "आधे इधर, आधे उधर' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणुतील सभेत ही टीका केली आहे.

डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी अवस्था आहे; अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.16) येथे आघाडीचा खरपूस समाचार घेतला. 

डहाणुतील भाजप महायुतीचे उमेदवार पास्कल धनारे यांच्यासाठी झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. 
फडणवीस म्हणाले, आघाडी सरकारने त्यांच्या सत्ताकाळात काय केले त्याचा हिशोब द्यावा. मीदेखील मागील पाच वर्षांचा हिशोब देतो. कॉंग्रेसची अवस्था दयनीय झाली असून मागच्या वेळी 42 आमदार निवडून आले होते; या वेळी 24 पण येणार नाहीत. सरकारने 70 वर्षांपासून भ्रष्टाचार केल्याचे सांगत राहुल गांधी अप्रत्यक्षपणे भाजपचेच समर्थन करतात. आघाडीचा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या शिटीवरही त्यांनी टीका केली. पालघर जिल्ह्याला सर्वात जास्त वेळा भेट देणारा मुख्यमंत्री मी आहे. जिल्ह्यातील कुपोषणमुक्ती 60 टक्के कमी करून जिल्ह्यातील कुपोषण घटवले, वारली हाटसाठी सरकारने 90 कोटी खर्च केले आहेत. मच्छीमार समाजासाठी युती सरकारने विविध योजनांची अंमलबजावणी केली.

कोल्ड स्टोरेज, धूपप्रतिबंधक बंधारे, बोटींसाठी अनुदान इत्यादी विकासकामे केली. 43 हजार वनपट्टे निकाली काढले. बागायती शेतीसाठी प्रोत्साहन दिले, श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून आदिवासींच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. रस्ते विकास योजनांतून खेड्यापाड्यात रस्त्यांचे जाळे विणले, सात लाख लोकांना घरे दिली. जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना निवारा, पाणी मिळवून दिले. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतून जिल्ह्यात साडेतीन हजार गॅस वाटप केले. प्रत्येकाला घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

राज्यातील तीन लाख अतिक्रमणे नियमित करून लोकांना घरासाठी जागेचे पट्टे दिले. 18 हजार गावात पाणी, जनारोग्य योजना, महात्मा फुले व मुख्यमंत्री आरोग्य योजनेद्वारे लोकांना मोफत उपचार व्यवस्था केली. आतापर्यंत 40 लाख लोकांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला. राज्यात 40 लाख अल्पबचत गट स्थापन करून महिलांच्या हाताला काम दिले. मोदींच्या नेतृत्वाखाली देश बदलत असल्याचे सांगत जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करून एकसंघ देशाचे स्वप्न मोदींनी पूर्ण केल्याचे फडणवीस यांनी या वेळी सांगितले. 

आपली लढत ही कम्युनिस्ट उमेदवाराशी असल्याचे सांगत भाजप उमेदवार धनारे यांनी विधानसभा क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती दिली. सभेस पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, गुजरातमधील खा. के. सी. पटेल, आमदार कनुभई देसाई, शंकरभाई वारली, डहाणू विधानसभा संयोजक भरत राजपूत, सहसंयोजक लक्ष्मण खरपडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, डहाणू भाजप अध्यक्ष विलास पाटील, भरत शहा, लुईस काकड, जिल्हा सरपंच परिषद अध्यक्ष सुरेश शिंदा, अपक्ष उमेदवार रमेश मलावकर, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अपक्ष उमेदवार भाजपच्या मंचावर! 

डहाणू विधानसभा निवडणुकीत विश्‍व हिंदू परिषद आणि माजी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते रमेश मलावकर हे अपक्ष म्हणून उभे आहेत. संघ, व्हीएचपी, विद्यार्थी परिषद, संघटन, वनवासी कल्याण केंद्रात त्यांना आदराचे स्थान आहे. ते डहाणू जनता बॅंकेत अधिकारी असून त्यांचा मतदारसंघात उत्तम लोकसंपर्क असल्याने ते या निवडणुकीत नशीब आजमावत होते; त्यांना सर्वत्र चांगले समर्थन मिळत असताना आज मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मलावकर यांना पत्रकार परिषदेत उपस्थित करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. या निवडणुकीत मलावकर यांनी धनारे यांना पाठिंबा दर्शविला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेत उमेदवार धनारेसह मलावकर एकाच मंचावर हजर होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis has made this criticism at a meeting in Dahanu