
Eknath Shinde : सावरकरांच्या नावे राज्य सरकार देणार शौर्य पुरस्कार, सी लिंकलाही नाव देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबईः आज सावरकरांची जयंती आहे. त्यानिमित्त राज्य सरकारने वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्रसेतू असं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
सावरकर जयंतीनिमित्त दिल्लीतल्या नवीन संसद इमारतीचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर जयंतीनिमित्त निर्णय जाहीर केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती आहे. शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरामध्ये अनेक कार्यक्रम सुरु आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आणि समुद्राचं नातं आहे. त्यामुळे वांद्रे-वर्सोवा सी लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्रसेतू' असं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, विविध क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनिय काम करुन शौर्य दाखवणारे किंवा संकटातून लोकांची मुक्तता करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता पुरस्कार देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र भवनामध्ये सावरकर जयंती साजरी केली. त्यानंतर संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला त्यांनी हजेरी लावली. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची एक बैठक पंतप्रधानांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला.