
मुंबई : शिवसेनेचे ५५ पैकी ३९ आमदारांनी बंडखोरी करत नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. मात्र सर्वाधिक आमदार आपल्यासोबत असल्याने आमचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर आमची शिवसेना मूळ आल्यामुळे आमच्यावर शिवसेना पक्षाने जरी केलेला पक्षादेश (व्हीप) लागू होत नसल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
रविवारी (ता.३) होणाऱ्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षादेश जारी करून शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले राजन साळवी यांनाच मतदान करावे, असा आदेश दिला आहे. शिंदे गटाने यापूर्वीच शिवसेना अधिकृत पक्ष असल्याचा दावा करीत व्हीप जरी केला असल्याचे जाहीर केले आहे. आमचा पक्षच अधिकृत असल्याने आमच्या प्रतोदाचा व्हीप सर्वाना बंधनकारक असून सुनील प्रभू यांचा ‘व्हीप’ आम्हाला लागू होत नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका तेवत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे मूळ पक्ष कोणता, आणि कोणाचा व्हीप शिवसेना आमदारांवर लागू होणार याबाबत तर्क लढविले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष प्रमुखांनी पक्षाचा गटनेता म्हणून आमदार अजय चौधरी यांची तातडीने नियुक्ती केली.
त्यापूर्वी एकनाथ शिंदे हे पक्षाचे गटनेते होते. त्याचबरोबर आमदार सुनील प्रभू यांची पक्षप्रतोद म्हणून पुनर्नियुक्ती केली. दरम्यान, शिंदे हे आपल्या सोबत असलेल्या आमदारांना घेऊन गुवाहाटी येथे गेले होते. तेथे त्यांनी पक्षाचा प्रतोद म्हणून आमदार भारत गोगावले यांची नियुक्ती केली. तर प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर यांची नियुक्ती केली आहे.