MNS on Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांची अवस्था 'शोले'तल्या असरानीसारखी; सभेआधीच मनसेने डागली तोफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांची अवस्था 'शोले'तल्या असरानीसारखी; सभेआधीच मनसेने डागली तोफ

मुख्यमंत्र्यांची अवस्था 'शोले'तल्या असरानीसारखी; सभेआधीच मनसेने डागली तोफ

औरंगाबाद इथं आज संध्याकाळी राज ठाकरेंची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सभा होणार आहे. या सभेसाठी गेल्या चार दिवसांपासून मनसेने शक्तिप्रदर्शन करत वातावरण निर्मिती केली आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अशातच या सभेला अवघे काही तास राहिलेले असताना मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे.

'शोले' चित्रपटातल्या असरानीसारखी मुख्यमंत्री ठाकरेंची अवस्था झाली आहे, असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. त्यांनी ट्विट करतही ही टीका केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून देशपांडेंनी एक मीम ट्विट केलं आहे. या मीममध्ये अभिनेते असरानी यांचा 'शोले' चित्रपटातल्या जेलरच्या भूमिकेतला फोटो आहे. या फोटोवर लिहिलं आहे की, अर्धे भाजपावर तुटून पडा, अर्धे मनसेवर तुटून पडा, मी घरीच बसतो.

याच मीमबद्दल माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधल्या असरानीसारखी झाली असल्याचं देशपांडे म्हणाले आहेत. सभेपूर्वी मनसेला पाठवण्यात आलेल्या नोटीस आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटींबद्दल बोलत असताना देशपांडे म्हणाले की, आम्हाला कायदा शिकवण्यापेक्षा जे कायद्यांचं पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक आणि हिंमत या सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकारने दाखवली पाहिजे.