शाळकरी मुलींचे बालविवाह! मुख्याध्यापकही असणार जबाबदार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'मॅडम, माझा बालविवाह होतोय!' फोन करून मुलाने थांबवले स्वत:चे लग्न
शाळकरी मुलींचे बालविवाह! मुख्याध्यापकही असणार जबाबदार?

शाळकरी मुलींचे बालविवाह! मुख्याध्यापकही असणार जबाबदार?

सोलापूर : बालविवाहात सोलापूर हे राज्यात अव्वल असून, ही ओळख पुसण्याची जबाबदारी आता ग्रामसेवकांबरोबरच झेडपी व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांवरही सोपविण्याचे शासन स्तरावर विचाराधीन आहे. प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक आहेत, पण ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने एकाच ग्रामसेवकाकडे तीन-चार गावांचा पदभार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील सहावी ते अकरावीच्या मुलींच्या पालकांचे प्रबोधन केल्यास ही अनिष्ठ प्रथा रोखू शकते, असा त्यामागील हेतू आहे. शाळेत दररोज येणारी मुलगी शाळेत यायची बंद झाल्यास संबंधित मुख्याध्यापक त्या कारणांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करतील.

सोलापूर जिल्ह्यात जानेवारी २०२० ते एप्रिल २०२२ पर्यंत जवळपास १४७ बालविवाह रोखण्यात आले आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. वास्तविक पाहता, गावस्तरावरील बालविवाह रोखण्यासाठी बालप्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकाला अधिकार आहेत. तालुकास्तरावर तालुक्याचा स्वतंत्र अधिकारी आहे. सोलापूर जिल्ह्यात करमाळा व मंगळवेढ्यासाठी तालुका बालसंरक्षण अधिकारी सध्या नाहीत. दुसरीकडे, जिल्ह्यातील एक हजार १९ ग्रामपंचायतींमध्ये ९५१ ग्रामसेवक असायला हवेत, पण सध्या ११५ ग्रामपंचायतींना ग्रामसेवकच नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांवरही आता त्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बालविवाह रोखले आणि मुलींचा शिक्षणातील टक्का वाढविल्याच्या कामाची दखल घेऊन झेडपी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल पुरस्कार मिळाला. आज त्याच मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करण्याची गरज असून, शिक्षकांच्या (मुख्याध्यापक) माध्यमातून ही प्रथा थांबविता येणे शक्य आहे. गावात किंवा शहरात बालविवाह होत असल्यास संबंधितांनी १०९८ या चाइल्ड लाइनच्या क्रमांकावर कॉल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गाव बालसंरक्षण समिती दिसतच नाही
कोरोनामुळे शाळा बंद, शिक्षणाचा खर्च पेलवत नाही, पालकांच्या हाताला काम नाही, बेरोजगारीत मोठी वाढ अशा विविध कारणांमुळे गावोगावी बालविवाह वाढले आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामसेवक, सरपंच यांची प्रत्येक गावात गाव बालसंरक्षण समिती असणे अपेक्षित आहे. पण, या समितीबद्दल अनेकांना काहीच माहिती नसल्याने या समित्या बहुतेक गावांमध्ये नाहीतच तथा काही समित्या कागदावरच आहेत.

मुख्याध्यापकांनाच आता प्रशिक्षण
अक्षय तृतीयेला विवाहाचा मोठा मुहूर्त असल्याने त्या दिवशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होऊ शकतात, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित यंत्रणेला वॉच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण, शाळांमधील मुलींचेच मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमधील मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून बालविवाहाचे तोटे, दुष्परिणाम, मुलींच्या आरोग्यावर होणारा परिणाम, कायद्यातील तरतुदी व शिक्षा याची माहिती मुख्याध्यापकांच्या माध्यमातून पालकांना व्हावी, असे जिल्हा बालविकास अधिकारी विजय खोमणे म्हणाले.