मुलांच्या लसीकरणाला अपुरा प्रतिसाद; राज्यात ४३ दिवसांत ११ टक्के लसीकरण

‘तुम्ही तुमच्या मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लस दिली नसेल, तर आवर्जून द्या,’’ असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले
children immunizations 11 percent vaccination in 43 days in the state pune
children immunizations 11 percent vaccination in 43 days in the state pune Sakal

पुणे : ‘‘तुम्ही तुमच्या मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लस दिली नसेल, तर आवर्जून द्या,’’ असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे. कारण, राज्यात १२ ते १४ वर्षे वयोगटात गेल्या ४३ दिवसांमध्ये केवळ ११ टक्के पूर्ण लसीकरण झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यात १२ ते १४ वर्षे वयोगटातील लसीकरण १६ मार्चपासून सुरू झाले. सुरुवातीला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या वयोगटातील लसीकरण कमी होत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले. मुलांची परीक्षा सुरू असल्याने या वयोगटातील लसीकरणाची गती कमी झाली असेल, असाही एक सूर निघत आहे. पण, आता उन्हाळ्याच्या सुटी सुरू होतील, त्यामुळे आपल्या मुलांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचे आवाहन खात्यातील अधिकाऱ्यांनीही केले आहे.

कधी पूर्ण होते?

पूर्ण लसीकरण झाले म्हणण्यासाठी ८० टक्के जणांनी लस घेतली पाहिजे. देशात ३५ टक्क्यांहून अधिक मुले आहेत. त्यामळे या मुलांचे लसीकरण वेगाने झाले पाहिजे.

सुट्यांमध्ये लसीकरण वाढेल...

राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले, ‘‘राज्यात १२ ते १४ वर्षे वयोगटातील लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद गेल्या दोन दिवसांपासून वाढला आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये लस घेण्याकडे पालकांचा कल असल्याचे यावरून दिसते. त्यामुळे पुढील महिन्याभरात या वयोगटातील लसीकरणाचा आकडा वाढेल, असा विश्‍वास वाटतो.’’

धोका टळलेला नाही...

बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले म्हणाले, ‘‘कोरोनाचा भयंकर उद्रेक सुरू असताना आपण सर्वांनी रांगा लावून लस घेतली आहे. त्यावेळी लशीचाही तुटवडा होता. आता हीच लस सहज मिळत आहे. अशावेळी आपल्याला वाटत आहे, की हा आजार आपल्याला परत होणार नाही. पण, वस्तुस्थिती तशी नाही. कोरोनाचे रुग्ण पुन्हा दिसत आहेत. भविष्यातही या लाटा येत राहण्याची शक्यता आहे.’’

महत्त्व काय?

  • नवीन येणाऱ्या विषाणूंचा व्हेरियंटला प्रतिकार करण्यासाठी मुलांचे लसीकरण महत्त्वाचे

  • घरातील मोठ्यांनी प्रतिबंधक लस घेऊन पुरेसे नाही. कारण, लस न घेतल्याने मुलांच्या माध्यमातून मोठ्यांना संसर्गाचा धोका

  • कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरण हे एकमेव उत्तर

पूर्ण लसीकरणाचे लक्ष्य अपूर्ण

मुंबई : पुढील वर्षभरात राज्यातील लसीकरण पूर्ण होईल, असे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २८ एप्रिल २०२१ रोजी केले होते.याला आता वर्ष होत आले तरी राज्याचे संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट अपूर्णच आहे. काही ठराविक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि कोरोनायोद्ध्यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. अद्याप ९२ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस तर ९३ कोरोनायोद्धांचे लसीकरण पूर्ण झाले. या पाठोपाठ १८ ते ६० वर्षे वयोगट व ६० वर्षांवरील ९२ टक्के नागरिकांचा पहिला डोस झाला आहे. १८ वर्षांवरील ७५ टक्के नागरिकांचे, ६० वर्षांवरील ७७ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण हे सर्वांत मोठे शस्त्र मानले जात आहे, पण अजूनही दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण करण्याकडे नागरिकांचा कल कमीच दिसत आहे.

बूस्टर डोसला अत्यल्प प्रतिसाद

राज्यात १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली होती. त्यानुसार आतापर्यंत तीन लाख ५९ हजार १०२ आरोग्य कर्मचाऱ्यांना, तर चार लाख १ हजार ७१८ कोरोनायोद्ध्यांना बूस्टर डोस दिला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटात १३ हजार ४८३, ४५-५९ वर्षे वयोगटात ७१ हजार ३२२ आणि ६० वर्षांवरील १४ लाख ३४७ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.

देशाच्या तुलनेत राज्यात लसीकरण कमी आहे. ज्या भागामध्ये आणि वयोगटामध्ये लसीकरण कमी आहे, तिथे अधिक लक्ष देऊ. सहा ते १२ वर्षे वयोगटातील लसीकरणामुळे जबाबदारी वाढली आहे.

- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

- डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी

लसीकरणाचे दुष्परिणाम खूप कमी आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले पाहिजे. यापूर्वी लसीकरणामुळे देवी, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात हे आजार नामशेष झाले. पोलिओदेखील लसीकरणामुळेच लक्षणीय कमी झाला. त्यामुळे कोरोनाला नामशेष करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे.

- डॉ. सुनील गोडबोले, बालरोगतज्ज्ञ

मुलाची दहावीची परीक्षा असल्याने आतापर्यंत त्याचे लसीकरण केले नाही. पण, परीक्षा संपल्यानंतर त्याच दिवशी लस घेण्यासाठी महापालिकेच्या केंद्रावर वेळ घेतली आहे.

- सागर हिंगे, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com