Laxman Jagtap passes away
Laxman Jagtap passes awayesakal

Laxman Jagtap Passes Away: शेतकरी पुत्र ते आमदार; अशी होती लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द

भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे आज मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघावर ज्यांची मजबूत पकड होती, असे लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार होते. (Laxman Jagtap Passes Away)

सत्तासघर्षापूर्वी, राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपनं जिंकल्यानंतर पहिल्याच प्रतिक्रियेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता. जगताप आणि टिळक यांनी आजारी असतानाही, रुग्णवाहिकेतून येऊन आपलं मत भाजप उमेदवाराच्या पारड्यात टाकलं होतं.

Laxman Jagtap passes away
Laxman Jagtap passes away : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द

पिंपळे गुरव येथील (पिंपरी चिंचवड) रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द कॉंग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले.‌ १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

राष्ट्रवादीसोबत बंडखोरी

१९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. मात्र, २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली.

विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. त्यातून आपली राजकीय ताकद दाखवून दिली.

Laxman Jagtap passes away
Laxman Jagtap Death : 12 दिवसांत भाजपने गमावले 2 आमदार

२००८ मध्ये विधानसभा व लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. हवेली व मुळशी विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाऐवजी पिंपरी-चिंचवड शहराची विभागणी मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात झाली. पिंपरी, चिंचवड व भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले.

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होती. आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला आणि युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला गेला होता. त्यामुळे बंडखोरी करत जगताप यांनी चिंचवड मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. व विजय खेचून आणला. मात्र, ते राष्ट्रवादी काँग्रेसशीच संलग्न राहिले.

१२८ पैकी ७७ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवली

२०१२ च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती पुन्हा सत्ता आली. मात्र, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास राज्यातील आघाडी सरकारने असमर्थता दर्शवली. तसेच, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

२०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला. त्याचवेळी भोसरी मतदार संघातून महेश लांडगे अपक्ष निवडून आले होते. त्यांचा २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. २०१७ ची महापालिका निवडणूक आमदार जगताप व आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आणि न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक विजय भाजपने मिळवला. १२८ पैकी ७७ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी आमदार जगताप यांची ओळख आहे. गेल्या विधान परिषद निवडणुकीत जगताप यांनी आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून मुंबईला जाऊन मतदान केले होते. त्यामुळे कोटा नसतानाही भाजपचा सहावा उमेदवार विजयी झाला होता.

शेतकरी पुत्र ते आमदार

पिंपळे गुरव येथील शेतकरी कुटुंबात १५ फेब्रुवारी १९६३ रोजी लक्ष्मण जगताप यांचा जन्म झाला. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, विधान परिषद सदस्य, विधानसभा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१८ च्या मंत्रीमंडळ विस्तारात जगताप यांची वर्णी लागेल, अशी चर्चा होती. पण, त्यावेळी मंत्री पदाने त्यांना हुलकावणी दिली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सरकार स्थापन झाले असते तर, जगताप यांना मंत्रिपद नक्कीच मिळाले असते, अशी आजही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com