esakal | 'तारीख ठरवली राणेंनी पण श्रेय घेतलं राऊतानी'
sakal

बोलून बातमी शोधा

'तारीख ठरवली राणेंनी पण श्रेय घेतलं राऊतानी'

'चिपी विमानतळ २००९ला मंजुर झाले. फडणवीस सरकारच्या काळात त्या विमानतळाचे ९० टक्के काम झाले.

'तारीख ठरवली राणेंनी पण श्रेय घेतलं राऊतानी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : कोकणवासीयांना आता सतत वाद, भयावह चित्र नको आहे. म्हणुनच केंद्रीय हवाई मंत्री ज्योतीरादित्य शिंदे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री किंवा संबंधितांनी चिपी विमानतळाच्या उद्‍घाटनप्रसंगी एकत्रित येत कुठल्याही प्रतिष्ठेचा, अहंकाराचा विषय न करता कोकणच्या विकासाला चालना द्यावी, असे आवाहन विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. चिपी विमानतळाच्या कामात वेगवेगळ्या परवानग्या मिळण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने विशेषतः केंद्रीय मंत्री राणे यांनी परिश्रम घेतले. त्यामुळे या विमानतळाचे श्रेय राणे यांनाच देण्यासाठी विरोधकांनी मोठे मन दाखविण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. येथील हॉटेल लेमन ग्रास येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार प्रसाद लाड, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, बंड्या सावंत उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, 'चिपी विमानतळ २००९ला मंजुर झाले. फडणवीस सरकारच्या काळात त्या विमानतळाचे ९० टक्के काम झाले. मोदी सरकारने उडाण योजनेत चिपी विमानतळाचा समावेश करून घेतला. ५ मार्च २०१९ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळाच्या इमारतीचे उद्‍घाटन झाले. या विमानतळाच्या कामासाठी सुरेश प्रभूंपासून सर्वांनी मदत केली. राणे, फडणवीस आणि केंद्राच्या माध्यमातून आता विमानतळ जनतेसाठी ९ ऑक्टोबरला खुले होत आहे. या कामात इतरांचाही हातभार लागला असेल; पण एखाद पत्र देवुन, बैठक घेऊन अशा प्रकारचा प्रकल्प उभा राहत नसतो. त्यासाठी प्रचंड पाठपुरावा, निधीची उपलब्धता, वेगवेगळ्या परवानग्या मिळविण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने परिश्रम घेतले.'

हेही वाचा: 'शहराला नवे कारभारी लाभुदे, साचलेल्या चिखलात कमळ फुलू दे'

पुढे ते म्हणाले, 'कोकणच्या विकासाला हे विमानतळ चालना देणार ठरणार आहे. त्यामुळे विरोधकांनी श्रेयवादाच्या लढाईतून बाहेर येवुन समन्वयातून कोकणचा विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. चिपी विमानतळासंदर्भात शिवसेना नेत्यांची वेगवेगळी भूमिका माध्यमांमध्ये दिसते. यातुनच त्या पक्षामध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांकडुन समन्वयाची अपेक्षा धरू नये. शिवसेनेकडुन ७ ऑक्टोबर ही तारीख चिपी विमानतळ उद्‍घाटनाची निश्चित झाली होती; पण त्या दिवशी उद्‍घाटन होवु शकत नाही. शेवटी हे खाते केंद्राचे आहे. एखाद्या खात्याचा प्रकल्प असतो, तेव्हा तेच खाते त्या प्रकल्पाचे उद्‍घाटन ठरवित असते. राणेंनी केंद्रीय व हवाई मंत्री शिंदे यांची भेट घेऊन चिपी विमानतळाच्या उद्‍घाटनाची तारीख निश्चित केली. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर करत श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.'

तीन कोविड सेंटरचे जिल्ह्यात लोकार्पण

भारतीय जनता पार्टीच्यावतीने सिंधुदुर्गमध्ये देवगड, सावंतवाडी व मालवण या ठिकाणी आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, आमदार भाई गिरकर या विधान परिषद आमदारांच्या निधीतुन १ कोटी ३५ लाख रूपयांची कोविड सेंटर उभी करण्यात आली आहेत. ती जनसेवेसाठी सुपूर्द करून एक प्रकारे त्या- त्या स्तरावर भाजपने जनतेला रूग्णालय देण्याच काम केल्याचे दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा: पालिका रणांगण - दलबदलू राजकारणाला वेग, शिवसेनेलाच पसंती

सरकारकडुन चाकरमान्यांचा छळ

कोकणात गणेशोत्सव हा मोठा सण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणवासीय मुंबईहुन कोकणात येत आहेत; मात्र सरकारकडुन चांगले नियोजन न केल्यामुळे अनेकांना तासनतास महामार्गावर ताटकळत राहावे लागत आहे. एका बाजुला चाकरमान्यांची आरटीपीसीआर केली जाणार नाही, असे सांगत असतानाच दुसऱ्या बाजुला गावात तपासणीचे नियोजन सुरू आहे. एकुणच या सरकारच्या यंत्रणेमध्ये विसंवाद असल्याचे दिसते. चाकरमान्यांसाठी टोल फ्रीचे मुंबईत बॅनर लागले; मात्र चाकरमान्यांना टोल भरूनच गावी यावे लागले. आम्ही तर चाकरमान्यांसाठी मोदी एक्स्प्रेस कोकणात आणुन सेवा दिल्याचे दरेकरांनी सांगितले.

केंद्राकडून पिकांना चांगला हमीभाव

केंद्राकडून भात, जवार, मुग, उडीद, सोयाबीन आदी पिकांना चांगल्या प्रकारे हमीभाव दिला. मोठ्या प्रमाणात खरेदीही केली; पण विरोधकांनी एकही चांगला शब्द याबाबत काढला नाही. आता केंद्रात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री म्हणुन नारायण राणे कार्यरत आहेत. त्यामुळे कोकणातील तरूणांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राणेंच्या माध्यमातून कोकणात अनेक छोटे उद्योग आणण्याचा प्रयत्न आहे. वेंगुर्लेतही मोठे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

हेही वाचा: Konkan Railway - आरक्षण नसलेल्या चाकरमान्यांना स्थानकात नो एंट्री

loading image
go to top